नागपूर : नात्याचा फायदा घेत चुलत मेहुण्यानेच नांदेडमधील व्यावसायिकाला फसवून तब्बल दीड कोटी रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागपूरच्या भरुट भावंडांसह चौघांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
शांतीलाल मोतीलाल जैन (वय ६१, रा. शिवाजीनगर, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. आरोपींमध्ये वर्धमाननगरातील प्रेमचंद झुंबरलाल भरुट, अनिल झुंबरलाल भरुट, नरेश झुंबरलाल भरुट आणि श्रेणिक अनिल भरुट यांचा समावेश आहे.
घर खरेदीसाठी घेतले कर्ज-
२०१५ मध्ये जैन यांनी घर खरेदीसाठी भरुट बंधूकडून ४८ लाख रुपये उसने घेतले. त्यावर दरमहा १.२५ टक्के व्याज आकारण्यात आले. एवढ्यावरच थांबता, घराची रजिस्ट्री प्रेमचंद भरुटच्या नावावर करण्याची व ४२ गुंठे शेती अनिल भरुटच्या नावावर करून देण्याची सक्ती करण्यात आली.
ब्लॅकमेलिंग व अतिरिक्त वसुली-
नियमित व्याज व मूळ रक्कम भरूनदेखील जैन यांना त्रास दिला गेला. चेक घेतल्यानंतरही दबाव टाकून ब्लॅकमेलिंग सुरू झाले. इतकेच नव्हे तर जैन यांच्या पत्नीवरही खोटे आरोप लावून प्रकरणात ओढले गेले.
शेती विक्री व तक्रार-
२०२२ मध्ये अनिल भरुटने जैन यांची शेती तब्बल ४१ लाखांना विकली. त्यानंतरही हिशेब चुकता करण्यात आला नाही. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर जैन यांनी नांदेड येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. प्राथमिक तपासानंतर चौघांविरोधात फसवणूक, धमकी आणि विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.