
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीच्या दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात आता पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांचीही चौकशीच्या कक्षेत एंट्री झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १८ जणांचा बळी गेला असून अनेक नागरिकांवर अजूनही उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य आरोपीशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलाने केलेल्या प्राथमिक चौकशीत विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी काही पोलीस कर्मचाऱ्यांचा संपर्क असल्याची बाब समोर आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले.
या कारवाईत दौंड उपविभागीय पोलीस कार्यालयातील सुभाष डोईफोडे, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील अजित काळे आणि सुमित वाघ तसेच यवत पोलीस ठाण्यातील रामदास जगताप यांचा समावेश आहे. चौकशी अहवालानुसार संबंधित कर्मचाऱ्यांचे वर्तन संशयास्पद आढळून आले असून ते पोलीस दलाच्या शिस्तीला बाधक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
चौकशीवर कोणताही परिणाम होऊ नये आणि साक्षीदारांवर दबाव येऊ नये यासाठी निलंबित कर्मचाऱ्यांचे मुख्यालय पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात निश्चित करण्यात आले आहे. त्यांना वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच सकाळ आणि सायंकाळ अशा दोन वेळा उपस्थिती नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे.
विषारी दारूकांडातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवीन धागेदोरे समोर येत आहेत. अवैध दारू व्यवसायाला पाठबळ देणाऱ्या व्यक्ती आणि यंत्रणांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला असून या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







