
बीड : देशभरात गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या पी. व्ही. कुलकर्णी याला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात अटकेनंतर आता बीड शहरातील शाहू नगर परिसरातील त्याच्या चार मजली बेकायदा इमारतीवर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. अनधिकृत बांधकाम असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित इमारतीचा भाग पाडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली.
नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाचा तपास करताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पी. व्ही. कुलकर्णी याला अटक केली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्याच्या मालमत्तांची पडताळणी केली असता शाहू नगरमधील बांधकाम नियमबाह्य असल्याचे समोर आले. याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली होती. नोटिशीची मुदत संपल्यानंतर अखेर इमारतीवरील कारवाईला सुरुवात करण्यात आली.
विशेष म्हणजे प्रशासनाकडून कठोर कारवाई होण्यापूर्वीच संबंधित ठेकेदाराने अनधिकृत भाग स्वतःहून पाडण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरात या कारवाईची जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या प्रकरणात लातूर येथील आरसीसी क्लासेसशी संबंधित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांना न्यायालयाने १० जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान ‘प्लॅटिनम गोल्ड बॅच’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
तपास यंत्रणा कुलकर्णी, मोटेगावकर आणि इतर संबंधित व्यक्तींमधील आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास करत असून, नीट पेपरफुटी रॅकेटमधील आणखी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईमुळे पेपरफुटी प्रकरणातील आरोपींविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.







