Published On : Fri, Apr 20th, 2018

‘प्रहार’चे ले. कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन

Advertisement

नागपूर : हजारो युवक व बालकांचे प्रेरणास्त्रोत, ‘प्रहार समाज जागृती’ संस्थेचे संस्थापक निवृत्त ले. कर्नल सुनील देशपांडे यांचे शुक्रवारी हृद्यविकाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. मराठा रेजिमेंटच्या लाइट इन्फॅन्ट्री बटालियनचे नेतृत्व करणारे ले. कर्नल देशपांडे यांच्या निधनाने उपराजधानीतील युवाचेतना अस्तंगत झाली. त्यांच्या मागे पत्नी शमा, मुली सोनाली महाजन आणि शिवाली, तसेच मोठा आप्तपरिवार आहे.

समाजाला लष्करी अनुशासन लागावे, भावी पिढी सुदृढ व देशासाठी त्याग करणारी असावी, या प्रेरणेने गेल्या दोन दशकांपासून समाजाला जागृत करण्याचे काम ले. कर्नल सुनील देशपांडे करीत होते. त्यांच्या प्रेरणेने आजवर सुमारे ३०० हून अधिक युवकांनी भारतीय लष्करात प्रवेश घेतला. बालवयापासूनच लष्करी शिस्त लागावी या उद्देशाने त्यांनी प्रहार प्राथिमक व माध्यमिक शाळाही स्थापन केली. त्यांच्या शाळेतून घडलेल्या विद्यार्थ्यांनी नंतर थेट लष्करात प्रवेश घेतला.

चित्रपट अभिनेता नाना पाटेकर यांचा ‘प्रहार’ या चित्रपटातील अखेरच्या दृष्यातून ले. कर्नल सुनील देशपांडे यांनी ‘प्रहार’ या संस्थेचे कार्य सुरू केले. त्या चित्रपटाच्या अखेरच्या दृष्यात नाना पाटेकर लष्करी वेशात धावतोय आणि त्याच्या मागे असंख्य नागडे बालके धावताना दिसत आहेत. ‘कमॉन कमांडो’, अशी आरोळी देत नाना पुढे जातोय. त्या दृष्याला प्रत्यक्षात साकारण्यासाठी ले. कर्नल सुनील देशपांडे यांनी ९ जानेवारी १९९४ रोजी ‘प्रहार समाज जागृती’ संस्थेची स्थापना केली. नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटासाठी त्यांनी मार्गदर्शक म्हणून कार्य केले

देशासाठी लढले

ले. कर्नल सनील देशपांडे यांनी १९६४ मध्ये सेकंड मराठा रेजिमेंटच्या लाइट इन्फॅन्ट्रीमध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून करिअर सुरू केले. त्यांना भारत व पाकिस्तान यांच्यात झालेल्या १९६५ च्या युद्धात शौर्य गाजवण्याची संधी मिळाली. शत्रुच्या हल्ल्याला त्यांनी परतवून लावले होते
पाकिस्तानच्या युद्धानंतर ले. कर्नल देशपोडे यांननी १९७१ च्या बांग्लादेश मुक्ती युद्धातही सहभाग घेतला होता. पाकिस्तानच्या शक्करगढ येथील युद्धात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. पाकिस्तानचे अनेक रणगाडे त्यांच्या इन्फॅन्ट्रीने उद्ध्वस्त केले होते.