Published On : Sat, Mar 9th, 2019

ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पामूळे काटोल-नागपूर अंतर 35 मिनिटात गाठणे शक्य -केंद्रीय रस्‍ते वाहतूक ,महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर : रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज लाईनवर मेट्रोच्या वातानूकूलित कोचेस (ब्रॉडग्रेज मेट्रो) नागपूर वरुन काटोल पर्यंत संचालित करण्याच्या प्रस्तावित प्रकल्पामुळे काटोल ते नागपूर हे अंतर 35 मिनिटात गाठणे शक्य होणार आहे, असे केंद्रीय रस्‍ते वाहतूक ,महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे सांगितले .

काटोल नगर परिषदेच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त काटोल स्थित नगर परिषद शाळा क्रमांक-11 च्या मैदानावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे विविध विकासकार्याच्या लोकार्पण व भूमीपूजनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी नागपूरचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे उपास्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार कृपाल तुमाने, रामदास तडस, ,जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर जि. प. नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव उपास्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नागपूर-काटोल या चार पदरी सिमेंट कांक्रीट रस्त्याचे सुमारे 1214 कोटी रुपयाच्या तरतुदीने होणा-या बांधकामाचे ई-भूमीपूजन यावेळी गडकरींच्या हस्ते करण्यात आले. याचप्रमाणे, सुमारे 84 कोटीच्या तरतुदीने नागपूर जिल्ह्यातील हायब्रीड अॅन्‍युईटी पॅकेज क्रमांक 126 अंतर्गत मंजूर नरखेड, घुबडमेट, झिल्पा, सावनेर रस्त्याची सुधारणा व 40.31 कोटी रुपयाच्या निधीच्या तरतुदीने केंद्रीय पर्यटन विकास मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजने अंतर्गत वाकी, अदासा, धापेवाडा, पारडासिंगा तेलंगखेङी व गिरड या तिर्थक्षेत्राच्या नागपुर सुधार प्रन्यास तर्फे होणा-या विकासकार्यांचे ई-भूमीपूजन यावेळी करण्यात आले.

काटोल –वरुड रस्त्याच्या कामात वर्धा नदीतील गाळ काढल्याने त्याचे रुंदीकरण व खोलीकरण तर झालेच पण या गाळातील मुरुम व माती रस्तेनिर्मिती मध्ये वापरली जात आहे. यामूळे जल संवर्धन होऊन जलसाठा वाढत आहे. काटोलमधील संत्रा उत्पादक शेतक-यांनी ‘टेबल फ्रुट’ आकाराच्या संत्र्यांच्या लागवडीसाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करुन संत्र्याच्या कलमामध्ये सुधारणा करुन त्याचे निर्यात मूल्य वाढवावे. जैव-इंधन, बायो. सी. एन. जी याच्या उत्पादना करिता पीकपद्धतीमध्‍ये बदल घडवून तसेच कृषीमध्‍ये नवे संशोधन आत्‍मसात करण्‍याचे आवाहन गडकरींनी यावेळी केले. काटोल-नागपूर हा 4 पदरी रस्‍ता सिमेंट कांक्रीटचा होणार असल्याने रस्‍त्‍यावर खड्डे पडणार नाहीत, याचाही त्‍यांनी विशेष उल्‍लेख केला.

केंद्र व राज्‍य सरकारच्‍या विविध योजना काटोल तालुक्‍यात यशस्‍वीपणे राबविल्‍या जात असून पंतप्रधान आवास योजना, उज्‍वला, कामगार योजनेचे कार्ड या सर्व योजनांसाठी निधीची तरतूद केली जात आहे. जिल्‍हा नियोजन निधीतून सुमारे 125 कोटी रूपयाची तरतूदही काटोल तालुक्यासाठी पालकमंत्री म्‍हणून आपण करणार आहोत, असे आश्‍वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी दिले. काटोल नगर परिषदेला 25 वर्ष वीज मोफत मिळेल अशा रितीने सौर्य उर्जेच्या प्रकल्‍पालासुद्धा मंजुरी मिळाली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आज 16 लक्ष रूपयाचा कृषी पंप सौर उर्जेच्‍या वापरामुळे फक्‍त 10 हजार रुपयामध्ये शेतक-यांना उपलब्‍ध होत आहे, असेही बावनकुळे यांनी यावेळी नमूद केले.

आज झालेल्‍या कार्यक्रमात काटोलमध्‍ये पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मंजूर सदनिकांच्या बांधकामाचे ई-भूमीपूजन,जि.प.नागपूरच्‍या आरोग्‍य केंद्राचे भूमीपूजन करण्‍यात आले. यासोबतच नरखेड तालुक्‍यातील सावरगाव, नरखेड, मोवाड ,पुसला रस्त्याचे रूंदीकरण, कारंजा, भारसिंगी, मोवाड, बनगाव, रस्‍त्‍याचे रूंदीकरण, भिष्‍णूर, खंडाळा, सावरगाव, पिपळा रस्‍त्‍याची सुधारणा अशा सुमारे 49 कोटीच्‍या कामाचे लोकार्पणही यावेळी गडकरींच्‍या हस्‍ते झाले.

या कार्यक्रमास राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपुरचे अधिकारी, काटोल तालुक्‍यातील नगर परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, स्‍थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.