Published On : Sat, Mar 9th, 2019

‘आम्ही भारताचे लोक’ने जिंकली रसिकांची मने

Advertisement

नागपूर महानगरपालिका व अस्तित्व फाउंडेशनचे आयोजन

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने आयोजित व बोधी फाउंडेशनतर्फे प्रभाग ३३ मधील बॅनर्जी ले-आउट परिसरातील भगवान नगर मैदानात आयोजित ‘आम्ही भारताचे लोक’ या मेगा म्युझीकल शोने रसिकांची मने जिंकली. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे दर्शन घडविणाऱ्या या शो ला नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नगरसेविका वंदना भगत, भारती बुंदे, उपायुक्त राजेश मोहिते, लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल, भाजपा दक्षिणचे अध्यक्ष संजय ठाकरे यावेळी उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले.

याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ‘आम्ही भारताचे लोक’ या सादरीकरणाच्या माध्यमातून भारताचा जाज्वल्य इतिहास रंगमंचावर खूबीने साकारण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाचा उर भरून येईल, अशा या प्रस्तुतीमुळे लोकांना आपल्या श्रीमंत इतिहासाची माहिती होईल. अशा प्रकारचे कार्यक्रम शहरभरात आयोजित करावे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या ॲड. सुलेखा कुंभारे यांनीही यावेळी आयोजकांचे अभिनंदन केले. इतिहासाची साक्ष असलेल्या प्रत्येक घटना जिवंत साकारणाऱ्या सादरकर्त्यांचेही कौतुक केले.

‘आम्ही भारताचे लोक’ या मेगा म्युझीकल शो ला बहुजन रिपब्लिकन एकता मंच आणि निर्धार महिला व बालविकास समितीचे सहकार्य लाभले आहे. भारताचा इतिहास, सामाजिक, राजकीय घडामोडी आदींचे सुंदर सादरीकरण असलेल्या ‘आम्ही भारताचे लोक’ला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.