Published On : Thu, Apr 25th, 2019

माजी सैनिक देतोय झोपडपट्टीच्या तरुणांना देशसेवेचे धडे

Advertisement

नागपूर शहरातील मुलांनी जास्तीत जास्त संख्येने सैन्यात जावे, यासाठी देशभक्तीचे धडे दिले जातात. मुलांनी सैन्यात जाऊन देशाची सेवा करावी, यासाठी त्यांना शारीरिक, मानसिक आणि सैनिकी प्रशिक्षणाची गरज असते. त्यासाठी अनेक संस्था मोठय़ा प्रमाणात पैसे मोजतात. मात्र, झोपडपट्टीत राहणार्‍या गरीब मुलांना माजी सैनिक राम कोरके सैनिकी प्रशिक्षण देत आहेत. मनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत सैनिकी शिक्षण आणि किट देऊन राम कोरके यांनी देशसेवेचे अभिनव उदाहरण सादर केले आहे.

मनपाच्या १0 वी ११ वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी २१ एप्रिल ते २0 मे दरम्यान दुर्गानगर महानगर पालिका शाळा, शारदा चौक येथे सायंकाळी ४ ते ७.३0 या वेळात मुलांना शारीरिक, मानसिक आणि आत्मसंरक्षण संबधित शिक्षण दिले जात आहे. या शिबिरात ९0 मुले मोफत शिक्षण घेत आहेत. सैन्यात जाऊन देशसेवा करावी, अशी प्रबळ इच्छा असणार्‍या मुलांसाठी ही स्वर्णीम संधीच आहे. मुलांना दररोज येथे शारीरिक प्रशिक्षणासोबत सैनिक बनण्यासाठी लागणार्‍या सर्व तयारींची माहिती दिली जात आहे. सोबतच त्यांच्याकडून त्या गोष्टींचा अभ्यासही करविला जातोय. सैनिकी शिक्षण घेण्याची इच्छा असणार्‍या मुलांच्या पालकांना त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. पण, या नि:शुल्क उपक्रमामुळे गरीब मुलांना खूप लाभ होणार आहे. शिबिरात पाच मार्गदर्शक मुलांचे मार्गदर्शन करीत आहेत. कर्नल विशाल शर्मा यांचेही मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले आहे. पुढील वर्षीपासून मुलींनाही या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. आपल्याकडील मुलांना सैनिकी सेवेबद्दलची माहिती फारशी नसते. त्यामुळे या क्षेत्राला करियर म्हणून निवडण्याकडे त्यांचा कल कमी दिसतो. सैनिकी सेवेतही करियरच्या भरपूर वाटा आहेत. याबद्दलची मोलाची माहिती अशा शिबिराच्या वतीने मुलांना मिळणार आहे. शिबिरात मुलांना अभ्यासासाठी फिटनेस किट नि: शुल्क देण्यात आली आहे. सोबतच रोज मुलांना नाश्ताही नि:शुल्क देण्यात येतो. सैनिकी शिक्षणाबद्दल अधिक माहितीसाठी माजी सैनिक कार्यालय एनआयटी कॉम्प्लेक्स, ब्लॉक नं. ७ , रिग रोड, रघुजीनगर, छोटा ताजबाग जवळ येथे सकाळी १0.३0 ते सायंकाळी ७ या काळात संपर्क साधता येईल, असे आवाहन राम कोरके यांनी यावेळी केले.