नागपूरचे माजी आमदार कृष्णराव पांडव यांचे निधन

नागपूर : माजी आमदार कृष्णराव रामाजी पांडव (८८) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. राजकीय व शैक्षणिक वर्तुळात त्यांनी मौलिक कार्य केले होते. नगरसेवक ते आमदार ही त्यांची कारकीर्द अतिशय प्रेरणादायी ठरली होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्ष अनुभवी नेत्याला मुकला आहे.

कृष्णराव पांडव यांनी १९६९ साली नगरसेवक पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९७० साली ते नागपूर महानगरपालिकेत उपमहापौर झाले. त्याच्या पुढील वर्षातच स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले व १९७३ साली ते शहराचे महापौरदेखील झाले. त्यानंतर १९८२ ते १९९४ या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषेदेचे ते सलग १२ वर्ष सदस्य होते. काँग्रेस पक्षातदेखील त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.

१९८१ साली ते जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम बघितले. २००० पासून ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी काँग्रेसच्या संघटन मजबुतीवर भर दिला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, केंद्रीय मंत्री वसंतराव साठे, निर्मला देशपांडे यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते


राजकीय क्षेत्रासोबतच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातदेखील त्यांनी मोठे काम केले. सन्मार्ग शिक्षण संस्था स्थापन करून त्यांनी एक नवीन अध्याय सुरू केला. संस्थेच्या अंतर्गत ४५ शैक्षणिक महाविद्यालयांची स्थापना केली व गरीब, वंचित, मागासवर्गीय मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यावर भर दिला.

रविवारी होणार अंत्यसंस्कार
कृष्णराव पांडव यांची अंत्ययात्रा रविवारी दुपारी १२ वाजता धंतोली येथील निवासस्थानाहून निघेल. त्यानंतर दिघोरी येथील राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात गिरीश व किरण ही दोन मुलं, चार मुली आहेत.