नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय कोळसा मंत्रालयाने नागपुरातील गोंडखैरी ता. कळमेश्वर येथील भूमिगत कोळसा खाण मेसर्स ‘अदाणी पॉवर’ला विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाला पत्र लिहिले.
अदानींच्या नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरी खाणीला तेथील स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. . ही खाण ८३२ हेक्टरमध्ये आहे. या खाणीचे क्षेत्र मेट्रोरिजनमध्ये आहे. मेट्रोरिजनचे १०० वर्षांचे नियोजन नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणकडून करण्यात आले आहे. खाणीच्या क्षेत्रात वेणा जलाशय असून त्याचे पाणी अमरावती रोड व खाण परिसरातील जनतेला पाणीपुरठा करते. या क्षेत्रात आयुध निर्माणी केंद्र असून ही संस्था केंद्राच्या सरंक्षण विभागाशी संबंधित आहे. या केंद्रातही या जलाशयाचे पाणी वापरले जाते. या खाण परिसरातील सर्व भाग निमशहरी असून दाट वस्तीचा असल्याचे देशमुख यांनी पत्रात नमूद केले.
या खाणीसाठी परिसरातील जमीन मोठ्या प्रमाणात अधिग्रहित केली जाईल. त्यामुळे येथील गावांचे व घरांचे पुर्नवसन करावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असे देशमुख यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला लिहिलेल्या पत्रात म्हटले.