Published On : Fri, May 8th, 2020

परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पाठवणार;जीव धोक्यात घालून कुणीही असुरक्षित प्रवास करु नये- अजित पवार

Advertisement

औरंगाबाद रेल्वेमार्गावरील मजूरांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्र्यांना दु:ख…

मुंबई : ८ मे -लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या मजूरांची घरी परतण्याची अधिरता… तळमळ… चाललेली पायपीट… मन विषण्ण करणारी आहे. परप्रांतीय मजूरबांधवांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. केंद्र व संबंधित राज्यांच्या सहकार्याने सर्व मजूरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे परंतु आपला नंबर येईपर्यंत, त्यासाठीची व्यवस्था होईपर्यंत मजूरबांधवांनी धीर धरावा… जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करु नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Gold Rate
24 May 2025
Gold 24 KT 96,300/-
Gold 22 KT 89,600/-
Silver/Kg 98,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जालना-औरंगाबाद रेल्वेमार्गावर बदनापूर ते करमाडदरम्यान रेल्वेरुळांवर झोपलेल्या १६ जणांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे असेही अजित पवार म्हणाले.

औरंगाबादनजिक रेल्वेरुळावर झालेल्या दुर्घटनेतील मृतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राने गेले दिड महिने राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्या साडे सहा लाख मजुर बांधवांच्या अन्नपाणी, निवारा, वैद्यकीय उपचारांची सोय केली. ती व्यवस्था आजही सुरु आहे. यापुढेही सुरु राहील. महाराष्ट्रात काम करणाऱ्या आमच्या परप्रांतीय मजूरबांधवांची राज्यसरकार काळजी घेत असताना काहींचा असा अपघाती मृत्यु होणं दुर्दैवी, क्लेषदायक आहे.

महाराष्ट्रात अडकलेल्या व आपापल्या राज्यात घरी जावू इच्छिणाऱ्या मजूर बांधवांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. केंद्र आणि संबंधित राज्याच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडली जात आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

टप्प्याटप्याने सर्वांना आपापल्या राज्यात जाता येणार आहे. ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना आपापल्या घरी जाता येईल. परंतु त्यासाठी घाई करु नये. ही घाई जीवघेणी ठरु शकते. मजूर बांधवांनी जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करु नये, कोरोनाच्या संकटावर आपण सर्वांनी मिळून लढायचं आहे, जिंकायचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं स्वत:ची, कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी सुरक्षितता बाळगली पाहिजे असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement