Published On : Wed, Apr 7th, 2021

बेडच्या उपलब्धतेसह अन्य माहितीसाठी समन्वयक कक्षात संपर्क करा – जिल्हाधिकारी

0712-2562668 व 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

कॉल सेन्टर क्रमांक 24 तास कार्यरत राहणार

नागपूर – जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे.तेथील नागरीकांना शासकीय व खासगी रुग्णालयात बेड,आयसीयु बेड, ऑक्सिजनची उपलब्धता ही माहिती एका कॉलवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्षाची (कॉल सेंटर)निर्मीती करण्यात आली आहे, याचा लाभ जिल्हयातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. समन्वय कक्षातील संपर्क क्रमांक 0712-2562668 असून 1077 या टोल फ्री क्रमांकावर नागरीकांनी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज केले. समन्वय कक्षातील या क्रमांकावर नागरीकांना चोवीस तास संपर्क करता येऊ शकेल असे ते म्हणाले.

6 मिनिटाची स्वतः करा चाचणी
ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी लक्षणे जाणवताच वेळ न दवडता उपचार सुरू करावे.गावात आशा व अंगणवाडी सेविकेमार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. कोरोनासाठी वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या सल्यानुसार 6 मिनीट चालण्याची जलद चाचणी करता येईल. त्यात चालण्यापूर्वी केलेली एखादया व्यक्तीची ऑक्सिजन (प्राणवायू ) पातळी व चालल्यानंतरची प्राणवायू पातळी यात जर 4 पेक्षा जास्त फरक असेल तर ते गंभीर आहे. ताप ,सर्दी ,खोकला,असल्यास वेळकाढूपणा न करता लवकर वैद्यकीय उपचार सुरू करण्याचे गरजेचे आहे. आरोग्याची स्थिती ढासळण्यापुर्वी नागरीकांनी नागपूर येथील शासकीय किंवा खासगी रूग्णालयात धाव घ्यावी.त्यासाठीच समन्वय कक्षाची स्थापना केली आहे.

ऑक्सिजनसाठा मुबलक उपलब्ध जिल्हयात ऑक्सिजन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.तुटवडयाची कोणतीही तक्रार नाही.जिल्हयातील ऑक्सिजन उत्पादकांखेरीज भिलाई स्टिल प्लॉन्टवरून देखील पुरवठा होत असल्याचे त्यांनी आश्वस्त केले.रेमडीसीव्हर औषधाच्या साठयाची माहिती घेण्यात येत असून मेडिकल स्टोअर्स मधून रेमडीसीव्हर वर विक्री करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. आता पुरवठादार थेट हॉस्पिटलला व हॉस्पिटल संबंधित मेडिकल स्टोअर्सलाच पुरवठा करणार आहे.खासगी रूग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची तपासणी, अन्न व औषध प्रशासन विभागातील चमूमार्फत करण्यात येणार आहे.तसेच चाचण्याच्या संख्येचे अपलोडींग व देयक तफावतीतील अपप्रकारांची देखील शहानिशा करत असल्याचे त्यांनी सांगीतले. नागपूरकरांनी ब्रेक द चेन मधील निर्बधासह मास्क,सॅनीटायजरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.