Published On : Fri, Jan 31st, 2020

आयुक्तांच्या आदेशानंतर मनपातील पार्कींगला लागली शिस्त

नागपूर : मनपा मुख्यालयातील बेशिस्त आणि अस्ताव्यस्त पार्कींग व्यवस्था पाहून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गंभीर दखल घेत पार्कींगला शिस्तीत आणण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या आदेशानंतर गुरूवारी (ता.३०) मनपा मुख्यालयातील पार्कींगला जणू शिस्तच लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मनपा मुख्यालयामध्ये येणा-या दुचाकी व चारचाकी वाहनांची बेशिस्तपणे होणा-या पार्कींगची स्थिती पाहता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी पार्कींग सुरळीत करण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या आदेशानंतर दुस-याच दिवशी पार्कींगसाठी रस्त्यावर खुणा आखण्यात आल्या. त्यानुसार चारचाकी वाहन पार्कही झाले. याशिवाय सुरक्षा रक्षकांचीही वाढ करण्यात आली.

त्यामुळे आयुक्तांच्या शिस्तशीरपणाचा प्रभाव मनपातील पार्कींगवरही दिसून आला. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहापुढे असलेल्या पार्कींगच्या जागेमध्ये तातडीने डांबरीकरण करण्यात आले असून शुक्रवार (ता.३१)पासून याठिकाणी दुचाकी वाहने पार्क करता येउ शकतील.