Published On : Thu, Sep 24th, 2020

स्वत:सह इतरांच्या सुरक्षेसाठी ‘जनता कर्फ्यू’चे पालन करा

महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शनिवारी व रविवारी घरातच राहा

नागपूर : नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी वाटत असली किंवा ‘रिकव्हरी रेट’जरी जास्त दिसत असला तरी संक्रमण खूप जास्त वाढले आहे. शहरात कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखावी. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये. स्वत:वर बंधने घालून जबाबदारीने या शनिवारी आणि रविवारी (२६ आणि २७ सप्टेंबर) ‘जनता कर्फ्यू’चे पालन करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

शहरातील कोव्हिडचा धोका वाढत असतानाच संक्रमणाची साखळी खंडीत करणे आवश्यक आहे. बेजबाबदारपणे रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या काही लोकांमुळे नियमांचे पालन करणा-यांचाही जीव धोक्यात आला आहे. कोरोनाची साखळी खंडीत व्हावी, नागरिकांनाही शिस्त लागावी यासाठी शहरातील सर्व जनप्रतिनिधींच्या सूचनेवरून महापौर संदीप जोशी यांनी १९ व २० सप्टेंबर आणि २६ व २७ सप्टेंबर रोजी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याची घोषणा केली होती. १९ व २० सप्टेंबर रोजी लागू करण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये शहरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. मात्र काही ठिकाणी बेजबाबदार वर्तनही दिसून आले. महापौरांनी घोषित केलेला दुसरा ‘जनता कर्फ्यू’ शनिवारी आणि रविवारी (२६ आणि २७ सप्टेंबर) रोजी लागू करण्यात येत आहे.

यासंदर्भात जनतेसाठी जारी केलेल्या संदेशात महापौर संदीप जोशी म्हणाले, झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. आपल्या प्रत्येकाच्याच घरात लहान मुले आहेत, वृद्ध माता-पिता, आजी आजोबा आणि आजारी व्यक्तीही आहेत. त्यामुळे आपल्या स्वत:च्या जीवाची काळजी घ्या. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घ्या. त्यासाठी आठवड्यातील दोन दिवस घरातच राहण्याची सवय बाळगा.

आपला बेजबाबदारपणा इतर कुणाच्याही जीवावर उदार होउ देउ नका. स्वत:सह आपले आप्तगण, कुटुंबिय सर्वांच्या सुरक्षेसाठी ‘जनता कर्फ्यू’चे पालन करा. शहरातील सर्व जनप्रतिनिधी, नगरसेवक आणि सर्व राजकीय पक्षांच्या वतीने सर्वांना हात जोडून विनंती करतो की, स्वत:साठी नव्हे किमान आपल्या परिवारासाठी घरातच राहा, असे भावनिक आवाहनही महापौरांनी केले आहे.