Published On : Thu, Jul 11th, 2019

महिलांच्या व बालकांच्या समस्या सोडविण्यावर भर : संगीता गिऱ्हे

महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाचा स्वीकारला कार्यभार

नागपूर : शहरातील महिलांच्या व बालकांच्या सर्व समस्या सोडविण्यावर भर दिल्या जाईल. महिला बचत गटातील महिलांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे यांनी दिली. गुरूवारी (ता.११) नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून संगीता गिऱ्हे यांनी पदभार स्वीकारला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मावळत्या समिती सभापती प्रगती पाटील, समिती उपसभापती दिव्या धुरडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना संगीता गिऱ्हे म्हणाल्या, महिला व बालकल्याण समिती व समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू. मागील वर्षीच्या काही योजना अद्यापही अपूर्ण आहेत. त्या योजनादेखील पूर्ण करण्यावर भर असणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महिला व बालकल्याण समितीद्वारे या वर्षात महिला बचत गटांसाठी काही नवीन करण्याचा दृष्टीने प्रयत्न करीन, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शहरातील महिलांच्या व बालकांच्या समस्या जाणून घेणे व त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणे हे महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीचे कार्य असते. संगीता गिऱ्हे हे कार्य अगदी सहजपणे करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख यांनी भाषणातून नवनियुक्त सभापती संगीता गिऱ्हे यांना शुभेच्छा दिल्या. महिला व बालकल्याण समितीद्वारे मागील काही वर्षांपासून महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात येत आहे. हा अतिशय स्त्युत्य उपक्रम आहे. यावर्षीही संगीता गिऱ्हे हा उपक्रम यशस्वीपणे राबवितीतील, असा आपणास विश्वास असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी मावळत्या सभापती प्रगती पाटील यांच्या कामांची प्रशंसा करत त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

माजी सभापती प्रगती पाटील यांनी नवनिर्वाचित सभपाती संगिता गिऱ्हे यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती देवी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार नगसेविका विशाखा मोहोड यांनी केले.

कार्यक्रमाला नासुप्रचे विश्वस्त आणि नगरसेवक भूषण शिंगणे, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव, उपसभापती सुनील अग्रवाल, नगरसेविका मंगला खेकरे, माधुरी ठाकरे, गार्गी चोपरा, भाग्यश्री कानतोडे, उज्ज्वला शर्मा, अर्चना पाठक, प्रमिला मंथरानी, जयश्री वाडीभस्मे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.