Published On : Sat, Jul 6th, 2019

बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा – बोंडे

खते आणि बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवरकडक कारवाई करणार,ग्रामपंचायत कार्यालयातून कृषी सहाय्यक करणार काम, कृषी विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहून, विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना मदत करणार

नागपूर : विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी तसेच सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असून शेतकऱ्यांशी संवाद वाढवून बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालय येथे कृषी विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यासंदर्भात विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती निशा सावरकर, सर्वश्री आमदार रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, संजय पुराम, प्रा. जोगेंद्र कवाडे, सुधीर पारवे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल हे उपस्थित होते.

कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, शेतकऱ्यांना शेतीविषयक खबरदारीच्या विविध सूचना वेळोवेळी द्याव्यात. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व अन्य कृषी निविष्ठा मिळाव्यात. युरियासाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागू नयेत, यासंदर्भात खबरदारी घ्यावी. बियाणांबाबतही अडचणी येऊ देऊ नयेत. बनावट खते-बियाणे पकडण्यासाठी धाडी टाकाव्यात. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास कृषी विभागाने शेतकऱ्यांना तत्परतेने मदत करावी. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देऊ नये. सोयाबीन पेरणी झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देशही श्री. बोंडे यांनी दिले.

कृषी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले, शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. कृषी सहाय्यक यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बसून कामकाज केले पाहिजे. यासंदर्भात त्यांच्या कामाचे वेळापत्रक तयार करुन याबाबत कार्यवाही त्वरित करण्यात यावी. अधिकाऱ्यांनी शेतावर जावे, शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जागेवरच सोडवाव्यात. शेतकऱ्यांशी संवाद वाढवावा, असे निर्देशही डॉ. बोंडे यांनी दिलेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी अतिशय प्रभावीपणे करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा. यापासून कोणीही वंचित राहू नये. बोंडअळीसंदर्भात व विविध नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारणही त्वरित करण्यात यावे. संबंधितांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावेत. खरीप पीककर्ज वाटपाचे उदिष्ट पूर्ण करावे. बँकांनी यासंदर्भात मागे राहू नये. उदिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकेवर कारवाई करण्यात येईल. कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. पीककर्जासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी वेळीच प्रशासनाने मांडाव्यात. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील सर्व पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले पाहिजे. पीकविम्यासंदर्भात कृषी आणि सहकार विभागाने समन्वयाने काम करावे. तालुका स्तरावर यासाठी दक्षता समिती स्थापन करावी. तालुका आणि जिल्हा स्तरावर यासाठी मदत केंद्र उभारावे. विमा कंपन्यानी अधिक जबाबदारीने काम करावे. असे विविध निर्देशही कृषी मंत्री डॉ. बोंडे यांनी दिले.

कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत शेतीशाळेचे जीपीएस ट्रँकिंग करण्यात यावे. कृषी विभागाच्या पडीक जागांचा बियाणे लागवडीसाठी उपयोग करून घेण्यात यावा. यासाठी ‘महाबीज’शी करार करण्यात यावा. विभागातील जिल्ह्यांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम राबविण्यात यावेत. यासाठी काही क्षेत्र विकसित करुन यातून जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करण्याचे निर्देशही डॉ. बोंडे यांनी दिले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विजेच्यासंदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या कृषी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने सोडवाव्यात. गावा – गावांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळी हवामान आधारित फळपीक विमा योजना, स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, मागेल त्याला शेततळे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, वनशेती अभियान या विविध योजनांचा आढावाही घेण्यात आला.