Published On : Thu, May 10th, 2018

नागपूर विभागातील पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामविकास विभागाचा गुणवंत पुरस्कार

नागपूर: राज्य व केंद्र शासनाच्या योजना व प्रकल्प राबविताना विशेष कौशल्य व गुणवत्तेचा वापर करुन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांची निवड करुन त्यांना प्रशिस्तीपत्र व गौरवचिन्ह देवून सन्मानित करण्यात येतो. यावर्षी राज्यातील 39 गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नागपूर विभागातील पाच अधिकाऱ्यांना गुणवंत पुरस्कार जाहीर झाला आहे.

विभागातील वर्धा जिल्हा हिंगणघाट येथील सहाय्यक पशुधनविकास अधिकारी प्रदीप उकंडराव थूल, गडचिरोली जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता संजय दशरथ खोकले, वर्धा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका सौ. कल्पना पुरुषोत्तम माळोदे, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक अब्दुल बहाब अब्दुल गफार कुरेशी तसेच परिचर बबनराव तुकाराम सोनखाये यांची गुणवंत अधिकारी व कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

राज्य शासनाने ग्रामविकास विभागाअंतर्गत राज्य व केंद्र पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्पांची अंमलबजावणी सुरु असून योजना राबवितांना प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य पणाला लावून जे अधिकारी व कर्मचारी सेवा बजावतात यामध्ये विशेष कौशल्य व गुणवत्तेचा वापर केलेल्या अशा अधिकाऱ्यांना 2005 पासून गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यावर्षी क्षेत्रियस्तरावरील तसेच मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांना प्रशिस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे.