Published On : Fri, May 15th, 2020

मनपाची पाच रुग्णालये कोविड हेल्थकेअर सेटर म्हणून विकसित होणार – पालकमंत्री

Advertisement

नागपूर : नागपूर महानगर पालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महानगर पालिकेचे रुग्णालये विकसित करण्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन होती आणि या कामासाठी सुमारे 1 कोटी 90 लक्ष एवढ्या निधीची आवश्यकता होती. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 1 कोटी 90 लक्ष रुपयांचा निधी महानगरपालिकेस देण्यास मंजुरी प्रदान केली आहे. नागपुरात 5 कोविड हेल्थ सेंटर विकसित होतील, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

पाचपावली रुग्णालय, सदर रुग्णालय, केटी नगर रुग्णालय, इमामवाडा विलगीकरण केंद्र, इंदिरा गांधी रुग्णालय अशी एकूण पाच दवाखाने विकसित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रुग्णालयांना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती.

नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. राऊत यांच्या पुढाकाराने 28 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार कोविड-19 प्रादुर्भावावरील अनुज्ञेय उपाय योजनांकरिता राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व आरोग्य संस्थांकरिता सन 2020-21 या आर्थिक वर्षात मंजुरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ह्या आर्थिक मंजुरीमुळे, नागपुरातील जनतेला महानगरपालिकेच्या रूग्णालयात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.