नागपूर: शहरात उघडकीस आलेल्या बनावट शिक्षक नियुक्ती घोटाळ्याची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती डीसीपी राहुल मदने यांनी दिली. सध्या सदर पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या प्राथमिक तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी चालू असून, लवकरच या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
या घोटाळ्यात एका बनावट मुख्याध्यापकाच्या नियुक्तीचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आणखी काही लोकांची चौकशी करण्यात येणार आहे. नागरिकांकडून आता या प्रकरणाशी संबंधित अधिकाधिक मौखिक व लेखी तक्रारी प्राप्त होत आहेत, ज्यांची पडताळणी सुरू आहे.
विशेष म्हणजे, या घोटाळ्याचे लोण आता नागपूरच्या बाहेर इतर जिल्ह्यांपर्यंतही पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. पोलिसांकडून या तक्रारींचीही गंभीर दखल घेण्यात येत असून, त्यांच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येणार आहे. तथापि, अद्याप या नवीन बाबींवर कोणतीही अधिकृत एफआयआर नोंदवण्यात आलेली नाही.
दरम्यान, या भरती घोटाळ्यात वापरलेल्या बनावट ‘शालार्थ आयडी’ संदर्भात नागपूर सायबर सेलमध्ये जानेवारी महिन्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणात एक स्वतंत्र एफआयआर दाखल असून, सायबर तज्ज्ञ तांत्रिक बाजूंनी तपास करत आहेत.
पोलिस आता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, पराग पुडके या व्यक्तीशी संबंधित प्रकरण आणि शालार्थ आयडी घोटाळा यामध्ये कोणतीही दुवा आहे का. शिवाय, बनावट दस्तावेजांवर साक्षांकित असलेल्या अधिकाऱ्यांचे सही खऱ्या आहेत की बनावट,याचीही चौकशी करण्यात येणार आहे. गरज भासल्यास संबंधित अधिकाऱ्यांची थेट चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
या प्रकरणाची चौकशी अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात येणार का? याबाबत विचारले असता, डीसीपी राहुल मदने यांनी सांगितले की, SIT गठित करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त घेतील.