नागपूर: सलग तीन दिवस तीन संस्मरणीय व मंत्रमुग्ध करणारे कार्यक्रम… महानाट्य शेगाविचा संत गजानन, श्रीराम व श्रीकृष्ण लीला यांचा मोहक कथ्थक सादरीकरण आणि मणी राम रंगीले हा संगीतमय कार्यक्रम – याशिवाय विख्यात होमिओपॅथ पद्मश्री डॉ. विलास डांग्रे यांचा माजी राज्यसभा खासदार व नामवंत नेत्रतज्ज्ञ डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते सत्कार — ह्या साऱ्या गोष्टींनी हनुमान मंदिर देवस्थान, टेलिकॉम नगर आयोजित हनुमान जन्मोत्सव (गुढीपाडवा – ३० मार्च ते हनुमान जयंती – १२ एप्रिल) विशेष गाजवला.
२ तास ३० मिनिटांचे महानाट्य शेगाविचा संत गजानन हे स्वर-मंथन ग्रुप तर्फे सादर करण्यात आले. प्रभाकर ठेंगडी लिखित व दिग्दर्शित आणि मोहन पत्रीकर निर्मित या महानाट्याने टेलिकॉम नगर, रामकृष्ण नगर, सेंट्रल एक्साइज कॉलनी, दक्षिण रेल्वे कॉलनी व प्रतापनगर येथील १००० हून अधिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संत गजानन महाराजांच्या प्रत्येक प्रसंगावर “गण गण गणात बोते…” आणि “जय गजानन माऊली!” अशा जयघोषांनी साऱ्या वातावरणात भक्तिभाव निर्माण झाला. अनेकांना जाणवले की ते प्रत्यक्ष शेगावात संत गजानन महाराजांच्या सान्निध्यात आहेत.
दुसऱ्या दिवशी संस्कार कथ्थक केंद्र ग्रुप तर्फे प्रियांकाताई अभ्यंकर यांच्या दिग्दर्शनाखाली श्रीराम व श्रीकृष्ण लीलांचे कथ्थक नृत्य सादर करण्यात आले. त्याच दिवशी स्वरसंगम ग्रुप तर्फे संगीतमय कार्यक्रम “मणी राम रंगीले” याचे सादरीकरण झाले.
या अगोदर, केंद्र सरकारतर्फे नुकतेच पद्मश्री सन्मान प्राप्त विख्यात होमिओपॅथ डॉ. विलास डांग्रे यांचा हनुमान मंदिर देवस्थान, टेलिकॉम नगर तर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी विख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. विकास महात्मे उपस्थित होते. हनुमान मंदिर कमिटीचे अध्यक्ष श्री. विजय सांडें आणि सचिव श्री. सुनील भालेराव यांनी डॉ. डांग्रे यांचा सत्कार केला.
हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली आणि संध्याकाळी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
हनुमान मंदिर देवस्थान, टेलिकॉम नगर कमिटीचे सदस्य तसेच जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर येथील महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी हनुमान जन्मोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.