Published On : Tue, Sep 12th, 2017

मत्स्यव्यवसाय हा कृषि व्यवसायाला समतुल्य मानला जावा -विभागीय आयुक्त अनूप कुमार

Advertisement

नागपूर: मत्स्यव्यवसाय हा कृषी व्यवसायाला समतुल्य मानला जावा व त्याप्रमाणे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना त्याचा लाभ मिळावा. जास्तीत जास्त मच्छीमारांना मत्स्य सहकारी संस्थांमध्ये समावेश करुन घेण्यासाठी मत्स्य सहकारी संस्थांच्या सदस्यता नोंदणीमध्ये नवीन तरतूदींचा अंतर्भाव करण्यावर भर देण्यात येईल. सद्यास्थितीचा अभ्यास करतांना मत्स्यव्यवसायातील काही अटी शिथील करण्याची गरज असल्याचे मत विभागीय आयुक्त तथा महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु अनूप कुमार यांनी आज व्यक्त केले.

महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात आज विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानाअंतर्गत विभागीयस्तरावरील आढावा बैठक घेण्यात आली. ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानाअंतर्गत विभागातील झालेले काम, पुढील कामाविषयी चर्चा व मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी मत्स्यव्यवसाय विकास आयुक्त गोविंद बोडके, विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ.कपील चांद्रायन, उपायुक्त (नियोजन) बी.एस.घाटे, मत्स्य व्यवसाय प्रादेशिक उपायुक्त समीर परवेझ, महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे संचालक, संशोधन तथा अधिष्ठाता डॉ.ए.एस.बन्नाळीकर, मत्स्य विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.पी.टी.जाधव, कुलसचिव तथा नियंत्रक डी.बी.राऊत, सहाय्यक प्राध्यापक सचिन बेलसरे तसेच विभागातील जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास), मत्स्य विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, विदर्भ विकास मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्याकडे पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा कुलगुरुंचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय विकास कृती आराखड्याची सद्यास्थिती जाणून घेवून पुढील नियोजन व संबंधित कार्यवाही करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर मत्स्यव्यवसाय विभाग तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान संपूर्ण नागपूर विभागात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. विदर्भ विकास मंडळाने मत्स्य विज्ञान विद्यापीठाला विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय विकासाचा कृती आराखडा अभ्यास अहवाल तयार करण्याचे काम सोपविले होते. त्याचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. सहाय्यक प्राध्यापक सचिन बेलसरे यांनी यावेळी विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय विकास कृती आराखड्याचे पॉवर पॉईंटद्वारे सादरीकरण केले.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अनूप कुमार म्हणाले की, ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान नागपूर विभागात प्रभावीपणे राबविण्यात येत असून याचधर्तीवर हे अभियान आता राज्यस्तरावर राबविले जाणार आहे. मत्स्यव्यवसायाच्या बाबतीत तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांनी चांगली प्रगती साधली आहे.

मत्स्यव्यवसायासारख्या पूरक व्यवसायामुळे शेतकऱ्यांचे शेतीवरील अवलंबित्व कमी होऊन त्यांची आर्थिकस्थिती उंचावण्यास मदत होते.शासनाच्या विविध उपक्रमाअंतर्गत जी शेततळी तयार झाली त्याची अद्ययावत माहिती मत्स्य विभागाने घ्यावी. तसेच शेततळ्यामध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यास त्यातील पाण्याचे कृत्रिम रुपाने पुनर्भरण करावे. जेणेकरुन मत्स्य व्यवसायाकरिता पाण्याची उपलब्धता कायम राहील. भूजलीय मत्स्य कायदा व धोरणे राज्यस्तरावर तयार करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा कायदा छत्तीसगड, ओरिसा, उत्तरप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अस्तित्वात आहे. हा कायदा आपल्याकडे लागू व्हावा, मत्स्य व्यवसाय हा शेती व्यवसायाप्रमाणे एक मुख्य व्यवसाय म्हणून ओळखला जावा, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

मत्स्यव्यवसाय करतांना जलाशय किंवा तलावातील पाण्याची बारमाही व्यवस्था राहावी याकरिता काय करता येईल याबाबतही यावेळी त्यांनी संबंधितांशी चर्चा केली.

पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्यावतीने क्षेत्रीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानाअंतर्गत मत्स्यव्यवसायाचे महत्त्व, उद्दीष्ट्ये, नियोजन, शास्त्रोक्तपद्धतीने तांत्रिक मार्गदर्शन याबाबत अध्ययन करण्याबाबत क्षेत्रीय भेटी व मार्गदर्शन करावे, असे अनूप कुमार यांनी यावेळी सुचविले.

‘तलाव तेथे मासोळी’ अभियाना अंतर्गत नागपूर विभागात एकूण 1506 तलावांची निवड केली आहे. या तलावांचे एकूण जलक्षेत्र 4622.40 हेक्टर आहे. यामध्ये बोटुकलीच्या संचयनाचे 285.54 लाख एवढे उद्दिष्ट आहे. या सर्वांसाठी अंदाजे 3 कोटी 50 लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. हा निधी नाविन्यपूर्ण योजना तसेच मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत प्राप्त होत आहे.

यावेळी मत्स्यव्यवसाय विकास आयुक्त गोविंद बोडके यांनी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या प्रेरणेतून ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्यामुळे कौतुक केले. विभागीय आयुक्त यांनी मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांचे जीवनमान उंचवावे, शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान प्रभावीपणे राबवित आहे. या अभियानाची विभागस्तरावरील परिपूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी. मत्स्यव्यवसाय संबंधित ज्याबाबी मान्यतेअभावी थांबल्या आहेत, त्यांना लवकरात लवकर मान्यता प्रदान करण्यात येईल. त्यांच्या तांत्रिक अडचणी सोडविल्या जाईल. हे अभियान राबवितांना अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्नदेखील लवकरच निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.