Published On : Wed, Sep 27th, 2017

सुरेवाणी बफरझोन येथे राज्यातील पहिली नाईट पेट्रोलिंग सफारी

Advertisement

नागपूर: समृध्द निसर्ग व वनसंपदेचा अनुभवासोबत जंगलातील मुक्त संचार असलेल्या विविध वन्य प्राणी, पक्षी तसेच जैव विविधतेने समृध्द वनसंपदेची पाहणी करण्यासाठी वनविभागातर्फे सफरीची व्यवस्था करण्यात येते. यासोबतच रात्रीचेही जंगल जवळून अनुभवता यावे यासाठी पेंच टायगर प्रकल्पांतर्गत असलेल्या सुरेवाणी (नागलवाडी) वनपरिक्षेत्राच्या बफरझोनमध्ये राज्यातील पहिल्या नाईट पेट्रोलिंग सफारीची सुविधा उपलब्ध झाली आहे.

नागपूरपासून केवळ साठ किलोमीटवर असलेल्या पेंच टायगर प्रकल्पाच्या सुरेवाणी (नागलवाडी) वनपरिक्षेत्रात नाईट पेट्रोलिंगची सुविधा उपलब्ध असून येत्या 15 ऑक्टोबरपासून पर्यटकांना नाईट पेट्रोलिंगच्या सफारीमध्ये सहभाग घेणे शक्य होणार आहे. सुरेवाणी परिसरातील 138 चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी 40 किलोमीटर परिसरात नाईट सफारीचे व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. सायंकाळी 7.30 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत नाईट पेट्रोलिंग सफारीमध्ये जवळून जंगल अनुभवता येणार आहे.

सुरेवाणी बफरझोन हे समृध्द जंगल म्हणून ओळखले जाते. या परिसरात वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, गव्हे, सांभर, चितळ, रानडुक्कर, चांदी अस्वल खवल्या मांजर आदी वन्य प्राणी तसेच विविध प्रकारचे पक्षी आणि रात्रीच्या जंगलात प्रत्यक्ष अनुभवता येणाऱ्या घुबडाच्या विविध प्रजाती, तसेच इगल आदी पक्ष्यांचे दर्शन पर्यटकांना अनुभवता येणार आहे. या रात्रीच्या सफारीमध्ये सुरेवाणीपासून सुरुवात होऊन महारकुंड तलाव, वाघझिरा, तसेच मध्यप्रदेशच्या वनसीमेपासून परत सुरेवाणी येथे ही सफारी समाप्त होईल. मागील वर्षी नाईट पेट्रोलिंगला पयर्टकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे यावर्षी सुध्दा ही सफारी सुरु ठेवण्यात आली आहे. मुख्य वनसंरक्षक तथा प्रकल्प संचालक ऋषिकेश रंजन, सहायक वनसंरक्षक शतानिक भागवत, तसेच नागलवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी रात्रीच्या गस्त पर्यटनांसाठी विशेष पुढाकार घेतल्यामुळेच राज्यातील पहिल्या नाईट पेट्रोलिंग सफारीचा आनंद पर्यटकांना घेणे शक्य झाले आहे.

नाईट पेट्रोलिंग सफारीसाठी दरदिवशी केवळ तीन जिपसी अथवा एसयुव्ही वाहानांनाच परवानगी राहणार आहे. या सफारीसाठी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र पकल्प, झिरो माईल जवळील कार्यालयात बुकींगची व्यवस्था उपलब्ध आहे. येथील दूरध्वनी क्रमांक 0712-2560727 तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नागलवाडी येथे सुध्दा सफारीची बुकींग करण्याची सुविधा आहे. या सफारीमध्ये वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच निसर्ग प्रेमींना प्राधान्य राहणार आहे. एका वाहनांमध्ये चार पर्यटक तसेच वाहन चालक व गाईड आणि फारेस्ट गार्ड सोबत असेण अनिवार्य करण्यात आले आहे. सफारीसाठी प्रत्येक गाडीला एक हजार रुपये शुल्क तसेच गाईडसाठी चारशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. रात्रीच्या पर्यटनासाठी वन विभागाने निर्दशित केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

रात्रीची पेट्रोलिंग सफारीचा आनंद घेता यावा यासाठी वनविभागातर्फे याच परिसरात निसर्ग मार्गदर्शन केंद्रामार्फत राहण्याची सुध्दा व्यवस्था केली आहे. यासाठी पाच इको होम, दोन डारमेट्री तसेच भोजनगृह, कॉन्फरन्स हॉल आदी सुविधा सुध्दा सुरेवाणी येथे उपलब्ध आहे. या सुविधेसाठी पर्यटकांना ऑनलाईन बुकींगसाठी mahaecotourism.gov.in यावर आरक्षण करणे आवश्यक आहे. सुरेवाणी येथे जाण्यासाठी नागपूर ते पाटणसावंगी, खापा टीपाईंट, खापा, बडेगाव, महारकुंड ते सुरेवाणी असा साठ किलोमीटरचा प्रवास राहणार आहे. वन विभागाच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातर्फे पहिल्यांदाच नाईट पेट्रोलिंग सफारीचा आनंद पर्यटकांना उपलब्ध झाला आहे. नागपूर जिल्हयाच्या निसर्ग व वन पर्यटनाच्या क्षेत्रातील हा उपक्रम राज्यात तसेच देशातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

मचान पर्यटनांच्या माध्यमातून सुर्यास्तापासून तर सुर्यादयापर्यंत मचानवर बसून निसर्ग व वन्य प्राण्यांना बघण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध झाली आहे. सुरेवाणी येथील वनक्षेत्रात यासाठी पाच मचान सज्ज करण्यात आले असून 15 फेब्रुवारी ते 15 जूनपर्यंत पर्यटकांना उपलब्ध होत आहे. यामध्ये तीन दिवस फुलमून आणि तीन दिवस ऑफटर फुलमूनचा अनुभव घेता येणार आहे. अठरा वर्षावरील पर्यटकांसाठी ही सुविधा असून एका मचानवर केवळ दोन पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी सुध्दा चौदाशे रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

फूट पेट्रोलिंग (पायदळ गस्त) ही सुविधा सुध्दा वन विभागातर्फे सुरु करण्यात आले असून सकाळी 6 ते 9 आणि दुपारी 3.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पायदळ पर्यटनाचा आनंद या माध्यमातून मिळणार आहे. दररोज तीन ग्रुप यामध्ये प्रत्येकी पाच वैयक्तिंना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी प्रती वैयक्ति तीनशे रुपये शुल्क राहणार असून प्रत्येक ग्रुपसाठी तीनशे रुपये गाईडसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे.

वन विभागातर्फे नाईट पेट्रोलिंग सफारी, मचान पेट्रोलिंग, तसेच फूट पेट्रोलिंग यासारख्या विविध सफारी आयोजित करुन पर्यटकांना समृध्द वनसंपदेसोबत वन्यप्राण्यांच्या अधिवासाची माहिती उपलब्ध होणार आहे. पर्यटकांसाठी नाईट पेट्रोलिंग सफारीचे मुख्य आकर्षण राहणार असून वन पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. नागपूर जिल्हयातील समृध्द वनसंपदा त्यासोबतच वन्यप्राण्यांच्या आकर्षणामुळे संपूर्ण जगातून पर्यटक नागपूरला भेट देतात. केवळ साठ किलोमीटरवर असलेल्या सुरेवाणी या पेंच टायगर प्रकल्पाच्या उपक्रमामुळे पर्यटन विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे.