Published On : Wed, Sep 27th, 2017

धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यासाठी दीक्षाभूमी सज्ज

Advertisement

नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी दीक्षाभूमी परिसर सज्ज झाला आहे. सोहळ्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या अंतिम तयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांनी बुधवार (ता.२७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सभागृहात घेतला.

यावेळी त्यांच्यासमवेत स्थायी समिती सभापती संदीप जाधव, प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (वाहतूक) डी.डी.जांभूळकर, कार्यकारी अभियंता (विद्युत )संजीव जैस्वाल, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाने, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, लक्ष्मीनगर झोन सहायक आयुक्त सुवर्णा दखने, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी महापौरांनी प्रशासनिक कामाचा आढावा घेतला. महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमी परिसरात २२० पिण्याच्या पाण्याचे अस्थायी नळ लावण्यात आले आहे. याशिवाय दीक्षाभूमी परिसरातील भागात टँकरने पाणी पुरविण्यात येणार आहे. ज्या भागात भोजनदान केले जाते, तेथे टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय परिसरातील विहिरींवर पंप बसविण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी दिली. ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटचीही व्यवस्था करण्यात यावी. पिण्याच्या पाण्यासाठी आपातकालीन मोबाईल क्रमांक सज्ज ठेवा, असे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

स्वच्छता विभागाद्वारे नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनमधून प्रत्येकी ५० सफाई कामगार असे एकूण ५०० सफाई कर्मचारी हे तीन पाळींमध्ये काम करणार आहेत. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची साफसफाई करण्यात आली आहे. परिसरातील वाढलेली झाडे-झुडपे, वाढलेले गवत कापण्यात आले आहे. महानगरपालिकेद्वारे १०४० टॉयलेट, ८० स्नानगृहे उभारण्यात आली आहेत. ठिकठिकाणी तक्रार निवारण केंद्र उभारण्यात आले आहे. अंबाझरी परिसरात सहा मोबाईल टॉयलेट उभारण्यात आले असल्याची माहिती डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिली.

महानगरपालिकेच्या विद्युत विभागाद्वारे परिसरात स्थायी ५५ व नऊ अस्थायी स्वरूपातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. याशिवाय ध्वनीप्रक्षेपक, ट्यूबलाईट, फ्लड लाईटची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजीव जैस्वाल यांनी दिली.

लोककर्मविभागाद्वारे शासकीय ओद्यौगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भाविकांच्या निवासासाठी शामियाना उभारण्यात आलेला आहे. त्याची पहाणी मान्यवरांनी केली. अग्निशमन विभागाच्या वतीने एक गाडी परिसरात २४ तास तैनात राहणार आहे. दुसरी गाडी काचीपुरा पोलिस चौकीजवळ तैनात करण्यात आली आहे. याशिवाय सहसज्ज बुलेट मोटारसायकलही परिसरात सज्ज करण्यात आली आहे. अंबाझरी तलावात अनुचित प्रकार घडु नये यासाठी बोटीची व्यवस्था व प्रशिक्षणार्थी तैनात केले असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

वैद्यकीय विभागाने दीक्षाभूमी परिसरात दोन ॲम्बुलन्सची व्यवस्था ठेवली आहे. ठिकठिकाणी डॉक्टर्सची चमू २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाने यांनी दिली. शौचालय व स्नानगृहासाठी पाण्याची सोय करावी, असे निर्देश आयुक्त अश्विन मुगदल यांनी दिले.

परिवहन विभागाद्वारे दीक्षाभूमी परिसरातून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेसपर्यंत अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली. शहरातील विविध भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी दीक्षाभूमीकडे येण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी दिले. याशिवाय इंदोरा चौक, गरोबा मैदान, मेडिकल, चंद्रमणी नगर येथून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. त्यामुळे त्याभागात अस्थायी बस थांब्याची व्यवस्था करण्यात यावी असेही ते म्हणाले.

बैठकीला लक्ष्मीनगर झोनमधील उपअभियंता रवींद्र मुळे, झोनल अधिकारी महेश बोकारे, कंत्राटदार सादिक भाई, शरद मेश्राम, ओसीडब्लुचे अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.