Published On : Wed, Jan 2nd, 2019

तुमच्यासोबत शिवसेना राहिल काय ते आधी बघा- नवाब मलिक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी निश्चित आहे त्याची चिंता तुम्ही करु नका आधी तुमच्यासोबत तुमचा सहकारी पक्ष शिवसेना रहातो का ते आधी बघा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले.

भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला वेगवेगळे लढण्याचे आव्हान दिले त्या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी समाचार घेताना चंद्रकांतदादा पाटील यांना आधी स्वत:चं बघा असा टोलाही लगावला.

चंद्रकांतदादा पाटील आम्हाला आव्हान देत आहेत की,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये हिम्मत असेल तर वेगवेगळी निवडणूक लढवून दाखवा. परंतु आमची आघाडी निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी देशात व महाराष्ट्रामध्ये ठरलेली आहे आणि आम्ही एकत्रितच निवडणूका लढवणार आहोत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

तुमचे सहकारी पक्ष तुमच्यासोबत निवडणूका लढवू इच्छित नाहीत किंवा यायला तयार नाही त्या भीतीपोटी तुम्ही दुसऱ्या पक्षांना आव्हान देण्याचे काम करत आहात.आधी शिवसेना तुमच्यासोबत राहिल का याची चिंता तुम्ही करा.आम्ही एकसंघ राहणार आहोत असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

तुम्ही अशी कितीही आव्हाने दिलीत तरी ती आम्ही स्वीकारणार नाही आमच्यासमोर फक्त एकच आव्हान आहे ते म्हणजे या देशातून…राज्यातून भाजपला हद्दपार करणे आणि ते आम्ही करुन दाखवणार असा जबरदस्त आत्मविश्वासही नवाब मलिक यांनी बोलून दाखवला.