Published On : Mon, Jul 20th, 2020

नागपुरात पती-पत्नीवर गोळीबार, परिसरात खळबळ

नागपूर (कळमेश्वर) : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील शिवाजी ग्राऊंड परिसरात सुधाकर खाडे यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या गणेश मेश्राम (32) व प्रियंका गणेश मेश्राम (28) या पती-पत्नीवर सोमवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी गोळीबार केला.

यात गणेश मेश्राम यांच्या पोटाला गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पत्नी प्रियंका हिला गोळी चाटून गेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींची संख्या सहा असल्याचे समजते.

गोळीबारानंतर ते घटना स्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मारुती मुळूक ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मेश्राम दाम्पत्य मुळचे नागपूरच्या जयताळा येथील राहणारे असून ते दोन वर्षापासून कळमेश्वर येथे राहतात. गणेश हा ट्रक चालक असल्याचे समजते. जुन्या वादातून ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून प्रियंकाच्या जबाबानंतर वस्तुस्थिती समोर येईल.