Published On : Mon, Jul 20th, 2020

शेतकर्‍यांवर आलेल्या संकटात पळ काढणारे सरकार : बावनकुळे

दूध भाववाढीसाठी आंदोलन, विभागीय आयुक्तांना दिले निवेदन
-तर 1 ऑगस्टपासून तालुकास्तरावर आंदोलन

नागपूर: शेतकर्‍यांवर कोसळलेल्या संकटात शेतकर्‍यांना कोणतीही मदत न करता पळ काढणारे हे सरकार असून शेतकर्‍यांच्या दुधाला 10 रुपये भाववाढ-अनुदान देण्याची मागणी आज माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपाचे शिष्टमंडळ आज विभागीय आयुक्तांना भेटले.

दुधाला 10 रुपये अनुदान देण्यात यावे, दूध भुकटीसाठी 50 रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकर्‍याचे सर्व दूध खरेदी करण्यात यावे या मागणीसाठी आज भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले.


नागपूर जिल्ह्यात ते माजी पालकमंत्री बावनकुळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. याप्रसंगी बोलताना बावनकुळे म्हणाले- दररोज 150 लाख लिटर दूध या जिल्ह्यात निर्मिती होते. यापैकी 30 ते 35 टक्के दूध वाया जाते. हे सर्व दूध शासनाने विकत घेतले पाहिजे व वाढीव अनुदानाचे पैसे शेतकर्‍याच्या खात्यात सरळ जमा केले पाहिजे.

शेतकरी आजही अडचणीत आहे. बोगस बियाणांमुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. 40 टक्के शेतकर्‍यांचे बियाणे उगवलेच नाही. युरिया शेतकर्‍यांना मिळत नाही. युरियाची प्रचंड टंचाई आहे. शेतकरी युरियासाठी दुकानांवर रांगा लावीत आहेत. दुसर्‍या बाजूला बँका कर्ज देत नाहीत, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. शासनाने आंदोलनाची वेळ देऊ नये. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या 1 ऑगस्टपासून तालुकास्तरावर दूध संकलन केंद्र बंद पाडण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

तसेच ग्रामपंचातींवर प्रशासक बसविण्याचा काळा अध्यादेश या शासाने त्वरित रद्द करावा. या अध्यादेशाच्या माध्यमातून शासन ग्रामपंचायतींवर शासकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही माजी पालकमंत्री बावनकुळे यांनी केला आहे.

या शिष्टमंडळात माजी आ. सुधीर पारवे, माजी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. सावरकर, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, किशोर रेवतकर, अनिल निधान, मनोज चवरे, चरणसिंग ठाकूर आदी विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेच्या वेळी उपस्थित होते.