Published On : Mon, Apr 9th, 2018

एमआयडीसीतील झिरो डिग्री रेस्टारेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान गुंडाचा ‘गोळीबार’

नागपूर – एमआयडीसी भागात एका बारमध्ये वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरु असताना एका इसमाने दारूच्या नशेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. एमआयडीसीतील झिरो डिग्री बार अँड रेस्टारेंटमध्ये रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. दरम्यान आरोपीचा नेम चुकल्याने पुढील अनर्थ टळला.

राजेश इंद्रपाल कुशवाहा (३०) हा आपल्या मित्रमैत्रिणींसमवेत रविवारी मध्यरात्री झिरो डिग्री बार अँड रेस्टारेंटमध्ये आपला वाढदिवस साजरा करीत होता. त्यावेळी त्याच्या मैत्रिणी सेल्फी काढत होत्या. तेव्हा मिहीर मिश्रा (३०) हा तेथे आला आणि त्यांना आपल्यासोबत देखील सेल्फीने घेण्यास सांगितले. यावेळी त्याने राजेशच्या मैत्रिणींसोबत गैरवर्तन देखील केले. तेव्हा राजेशने मिहीर याला तेथून जाण्यास सांगितले असता त्याने आपल्याजवळ लपवलेली बंदूक बाहेर काढली राजेश्वर गोळी झाडली. परंतु त्याचा नेम चुकला. सदर घटना मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास घडली.

राजेश कुशवाहा याच्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी मिहीर मिश्रा याच्यावर भां. द. वि. च्या आर्म्स ऍक्ट अंतर्गत कलम ३०७, ३५४(D), ५०६(B) नि उपकलम २/२५, २७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.