Published On : Thu, Jun 13th, 2019

राजधानी एक्स्प्रेसला लागली आग

Advertisement

नागपूर : सिकंदराबादवरून निजामुद्दीनला जात असलेल्या १२४३७ राजधानी एक्स्प्रेसला रात्री १० वाजता नरखेड-दारीमेटा दरम्यान अचानक आग लागली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस नागपूरवरून बुधवारी सुटली. ही गाडी रात्री १० वाजता नरखेड ते दारीमेटा दरम्यान किलोमीटर क्रमांक ९४८ येथे असताना या गाडीच्या मागील एसएलआर कोचमधून धूर आणि आगीच्या ठिणग्या निघाल्या. ही बाब गार्डच्या लक्षात आल्यानंतर त्याने लगेच वॉकीटॉकीवरून लोकोपायलटला सूचना दिली. त्यानंतर लगेच ही गाडी थांबविण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. काही अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष गाठले. नरखेड स्टेशन आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने एसएलआर कोचला वेगळे करण्यात आले. आग लागलेला कोच गाडीपासून वेगळा करण्यात आला.

जवळपास दीड तासानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या घटनेमुळे केरळ एक्स्प्रेससह काही गाड्यांना विलंब झाला.