Published On : Wed, Apr 15th, 2020

अग्निशमन सेवा दिनानिमित्त हुतात्म्यांना मनपातर्फे अभिवादन

नागपूर : कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्कारणा-या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातील जवानांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील हिरवळीवर मंगळवारी (ता. १४) महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सर्व शहीद जवानांनाच्या स्मृतीचिन्हास पुष्पार्पण करून अभिवादन केले.

अग्निशमन विभागात कार्यरत असताना आणि कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिवस तर १४ ते २० एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे नागपूर महानगरपालिका अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागातर्फे कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम न करता सामाजिक अंतर ठेवून मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. १४) मनपाच्या सिव्हील लाईन मुख्यालयात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

लंडनहून कराचीमार्गे १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईत गोदीत दाखल झालेल्या ‘एस.एस. फोर्ट स्टिकिंग’ या जहाजाचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या दिवसाचे स्मरण म्हणून संपूर्ण भारतात अग्निशमन सेवेतील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. आगीच्या धोक्यासंदर्भात जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने १४ ते २० एप्रिल या कालावधीत संपूर्ण देशात अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो. नागपूर महानगरपालिका अग्निशमन विभागातील स्थानाधिकारी गुलाबराव कावळे, फायरमन प्रभू कुहीकर, रमेश ठाकरे हे कर्तव्यावर असताना शहीद झाले. या तिघांनाही यावेळी अभिवादन करण्यात आले.