Published On : Thu, Mar 29th, 2018

आकांक्षित जिल्हा विकासाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी नवा मार्ग शोधा – हंसराज अहीर

Advertisement


गडचिरोली: देशातील निवडक जिल्हयात गडचिरोली जिल्हा सर्वांगीण विकासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडला आहे. अपेक्षित विकासाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सर्वांनी पारंपरिक पध्दतीने कामे न करता नव्या मार्गाने गतिमान पध्दतीने काम करावे लागेल असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले.

पंतप्रधान आकांक्षित जिल्हा योजना अंतर्गत गडचिरोलीची निवड आली आहे. या कालबध्द कार्यक्रमास 1 एप्रिल 2018 पासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस खा. अशोक नेते, जि.प.अध्यक्षा योगिता भांडेकर , आमदार डॉ.देवराव होळी, नगराध्यक्षा योगिता पिपरे, वडसा नगराध्यक्षा शालू दडवते, राज्याचे विशेष पोलिस महानिरिक्षक कनकरत्नम, जिल्हाधिकारी शेखरसिंह, पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, तसेच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकरी शान्तनु गोयल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

देशात एकावेळी 101 जिल्हयात हा कालबध्द विकास कार्यक्रम सुरु होत आहे. त्यात गडचिरोलीचा समावेश आहे. यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याचे स्वत:चे लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री देखील यात विशेष लक्ष देतील असे सांगून अहीर म्हणाले की जिल्हयातील अधिकाऱ्यांनी विकासाची दृष्टी ठेवून काम करावे यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही.

विकास करताना प्रथम उद्दीष्ट येथे घराघरात प्रत्येकाचे उत्पन्न वाढावे हा आहे. आपल्या मंत्रालयातर्फे नागरी कृती कार्यक्रम यासाठी राबविण्यात येत आहे. यातून आतापर्यत गडचिरोली जिल्हयात केंद्रीय सुरक्षा दलाच्या माध्यमातून 1700 कुटूंबाना उपजिविकेचे साधन उपलब्ध करुन देण्यता आले आहे असे ते म्हणाले.

नक्षलग्रस्त जिल्हयां मध्ये मुलभूत साधन सुविधा निर्मितीसाठी देशातील काही जिल्हयांना केंद्रातर्फे 3000 कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. यातून गडचिरेाली जिल्हयास 33 कोटी रुपये मिळणार आहेत. याखेरीज पंतप्रधान आकांक्षित कार्यक्रम अंतर्गत जिल्हयात 43 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्य शासनाने केली असल्याचे सांगून ते म्हणाले की रस्ते बांधणी करिता पहिला टप्पयात 229 कोटी रुपये देण्यात आले तर आता दुसऱ्या टप्पयात 239 कोटी रुपये दिले जातील.

नक्षलग्रस्त भागात अधिकाधिक दुर्गम क्षेत्रात असणाऱ्या पोलिस दलाच्या जवानांसाठी मोबाईल कनेक्टीविटी महत्वाची आहे. यासाठी बी.एस.एन.एल. ने गतिमान पध्दतीने टॉवर उभारणी करावी व पोलिस दलाच्या गरजेनुसार नेटवर्क उभारावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यासंदर्भात बैठक घेऊन जिल्हाधिकारी याला गती देतील असेही ते म्हणाले.

वीज पुरवठा द्या
अनेक भागात लघुसिंचन क्षमता असूनही केवळ वीज पुरवठयाअभावी केवळ 91.87 हेक्टर क्षेत्र सध्या लघुसिंवना खाली आहे. शेतीपंपाची सर्व प्रलंबित जोडणी तत्काळ देण्यात यावा असे निर्देश अहीर यांनी यावेळी दिले.

जिल्हयात 267 गावे विद्यूत पुरवठयाविना आहेत यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 218 गावे वीज वितरण कंपनीच्या अंतर्गत आहेत. 59 गावे शिल्लक आहेत तसेच 49 गावांना सौर उर्जेने वीज पुरवठा करण्यात येणार आहे. यावर अहीर यांनी समाधान व्यक्त केले व उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या

गटशेती व सोलर पंप
जिल्हयात 11 आदीवासी शेतकरी गटांना कृषी पंप पुरवण्यात आले आहेत यासाठी प्रत्येक गटामागे 10 लाख रुपये खर्च शासन देते.

येणाऱ्या काळात गटशेतीच्या कार्यक्रमास गती द्यावी असे निर्देश अहीर यांनी दिले. यासाठी शासन प्रत्येक गटामागे 1 कोटी रुपये देते. असे 600 प्रस्ताव सध्या आहे. आणखी कितीही प्रस्ताव आले तर त्यासाठी आपण निधी देवू असे अहीर म्हणाले.

आरोग्य सेवा/ शिक्षण
आकांक्षित कार्यक्रमांतर्गत जे घटक ठरविण्यात आले आहेत त्यात आरोग्यास प्राथम्य आहे. रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यासोबत निक्त पदे भरण्यास आरोग्य विभागाने प्राधान्य द्यावे असे अहीर म्हणाले.

शालेय शिक्षणात गडचिरोलीची स्थिती चांगली आहे. मात्र 2012 पासून भरती बंद असल्याने शिक्षकांची 200 पदे रिक्त आहे. ती आता भरण्यात येतील. केंद्रप्रमुखपदी पदोन्नती व बंगाली शाळोचे शिक्षक याबाबत आमदार डॉ. होळी यांनी बैठकीत आग्रही मागणी केली.

आरंभी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी पॉवर पॉईन्ट सादरीकरणद्वारे या कार्यक्रमाचा उद्देश व निकस यांची माहिती दिली कार्यक्रमाचा दैनदिन स्तरावर आढावा घेणे शक्य व्हावे याची व्यव्स्था यात करण्यात आली आहे.

विविध विकास घटक विचाराचा घेऊन यात जिल्यांची क्रमवारी निश्चित करण्यात येणार आहे. आरंभीच्या स्थितीत गडचिरोली या101 जिल्यात 14 व्या स्थानी आहे. राज्यातील वाशिम 11 व्या तर नंदूरबार 39 व्या स्थानावर आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नियोजन अधिकारी अनिल गोतमारे यांनी केले.