नागपूर: दहावीच्या यशस्वी प्रवासाला मिळाली उजळणी! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज दहावीचा निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. यंदा संपूर्ण राज्यात एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही यशाची टक्केवारी गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय ठरत आहे.
राज्यभरात १५.५८ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी-
महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी या नऊ विभागीय मंडळांतून तब्बल १५ लाख ५८ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली आणि १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.
खास विद्यार्थ्यांचाही उल्लेखनीय निकाल-
खासगी विद्यार्थ्यांच्या गटात २८ हजार ५१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २८ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाचा एकूण निकाल ९३.०४ टक्क्यांवर स्थिरावला आहे.
गैरप्रकार झालेल्या ३७ केंद्रांची मान्यता रद्द होणार-
या परीक्षेदरम्यान राज्यभरात काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे अशा ३७ परीक्षा केंद्रांची मान्यता चौकशीअंती पुढील शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे.
यंदाही मुलींची टक्केवारी सर्वाधिक, कोकणाची पुन्हा बाजी-
सर्व विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के आहे. सर्व विभागीय मंडलातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतची टक्केवारी ९६.१४ टक्के असून मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. याचाच अर्थ नेहमीप्रमाणे मुलीनी निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्के जास्त आहे.
दरम्यान दहावीचा निकाल हा केवळ एक टप्पा नसून, तो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा दिशादर्शक ठरतो. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!