Published On : Fri, May 24th, 2019

अखेर प्रकाश आंबेडकर वंचितच राहिले

Advertisement

नागपुर/मुंबई: राज्यात ४२ लोकसभा जागा जिंकण्याचा दावा करणाºया वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना अकोला आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात दारुन पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे आणि भाजपचे जयसिधेश्वर महाराज यांच्यात लढत झाली. या लढतीत प्रकाश आंबेडकर यांचा दारूण पराभव झाला आहे. तर, अकोला लोकसभा मतदार संघातून प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे संजय धोत्रे यांच्यात प्रमुख लढत झाली. परंतु, याही मतदारसंघात त्यांचा पराभव झाला.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना या निवडणुकीत यश मिळाले नसले तरी काँगे्रस-राष्ट्रवादी काँगे्रसच्या किमान १९ उमेदवारांना पराभवाच्या छायेत ढकलण्याची किमया मात्र वंचित आघाडीने केली आहे. राज्यातील ४८ जागांपैकी जवळपास ४४ जागांवर वंचित आघाडीच्या मत विभागणी धोरणामुळे भाजप-शिवसेना युतीने आघाडी घेतली. तर औरंगाबादेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी काही काळ आघाडी घेतल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची हमी देणारे मावळ, शिरूर, अहमदनगर, रायगड, बुलढाणा, परभणी, अमरावती, सातारा, बारामती, माढा, बीड, जळगांव या लोकसभा मतदारसंघासह १२ ठिकाणी विजयाची खात्री होती. परंतु, यातील सातारा आणि बारामती, शिरूर या तीन मतदारसंघात राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार विजयी झाले. तर दुसरीकडे काँग्रेसला नांदेड, यवतमाळ-वाशिम, सोलापूर यासह ८ ठिकाणी विजयाची आशा होती. परंतु, या आठही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेसचे उमेदवार ५० ते ७० हजार मतांच्या फरकाने मागे पडले. औरंगाबाद वगळता सर्वच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना ५० ते ७० हजारांच्या आसपास मते मिळाली आहेत. त्याचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांना बसला असून त्यांचे तितकेच मार्जिन कमी झाले. त्यामुळे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसल्याचे दिसत आहे.