नागपूर: नरखेड येथील एमआयडीसीमध्ये जागा नसल्याने काही उद्योग येवू शकत नाही. यामुळे येथे नवीन एमआयडीसीची मागणी होत होती. यासाठीचा प्रस्ताव तयार करुन राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. अनेक वेळा अधिवेशनात सुध्दा या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी हा मुदा उपस्थीत केला होता. नुकत्याच झालेल्या हाय पॉवर कमेटीमध्ये नरखेड येथील एमआयडीसी फेज २ ला मान्यता देण्यात आली असून जवळपास १५४.४४ हेक्टर जमीन खरेदी करण्यात येणार आहे.
सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मंजुरी मिळाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जि.प. सदस्य सलील देशमुख यांनी दिली.
नरखेड येथील एमआयडीसी मध्ये २०.५९ हेक्टर जमीन आहे. परंतु ही सर्व जमीन वितरीत करण्यात आली आहे. नरखेड आणि परिसरात नविन उद्योग यावे यासाठी सलील देशमुख यांनी गेट वे फोरमच्या माध्यमातुन काही उद्योजकांची भेट घेतली. त्यांनी नरखेड येथे उद्योग सुरु करण्यासाठी सकारात्मक उत्तर दिले. परंतु एमआयडीसीमध्ये जागा नसल्याने नविन जमीन खरेदी करण्याची आवश्यकता होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना आमदार अनिल देशमुख यांनी तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या सोबत बैठक घेवून प्रस्ताव तयार करण्याची मागणी केली होती. यानंतर हा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले.
प्रस्ताव तयार करण्यासाठी सलील देशमुख यांनी नागपूर पासुन तर मुंबईत मंत्रालयापर्यत सातत्याने पाठपुरावा केला. अनिल देशमुख हे एका खोटया आरोपात तुरुंगात असतांना सुध्दा सलील देशमुख यांनी आपला सातत्यपुर्ण पाठवुरावा सुरुच ठेवला होता. १५४.४४ हेक्टर जमीन खरेदीचा प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो मंजुरीसाठी हायपॉवर कमेटीकडे गेला होता. हायपॉवर कमेटीची या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी सलील देशमुख यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह संबधीत विभागाच्या सचीवांची अनेक वेळा मंत्रालयात भेट घेतली. जागेच्या पाहिणीसाठी सलील देशमुख हे स्वत: अधिकाऱ्यांना घेवून नरखेड येथे गेले होते. नरखेड एमआयडीसी फेज २ साठी लागणाऱ्या १५४.४४ हेक्टर जमीन खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी आमदार अनिल देशमुख यांनी अनेक अधिवेशात या मुदा लावुन धरला होता. सातत्यपुर्ण केल्या पाठपुराव्यामुळे अखेर नरखेड एमआयडीसी फेज २ ला मान्यता मिळाल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली.
राज्य शासनाने मंजुरी द्यावी-
हायपॉवर कमेटीने नरखेड एमआयडीसी फेज २ ला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकराने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष जमीन खरेदीला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने याला लवकरात लवकर मंजुरी देण्यासाठी या भागाचे आमदार अनिल देशमुख हे सध्या मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तर मुदा उचलतील, पण राज्य सरकारची मंजुरी मिळण्यासाठी माझा सातत्यपुर्ण पाठपुरावा हा सुरुच राहणार असल्याचेही सलील देशमुख यांनी सांगीतले.