नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत ‘हिट अँड रन’ प्रकरणासंदर्भात कठोर पाऊले उचलली आहे. काल मुंबईत पहाटेच्या सुमारास एका महिलेला भरधाव कारने फरफटत नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिंदे गटाच्या उपनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह ही कार चालवत असल्याची माहिती समोर येत असून याप्रकरणी पोलिसांकडून सध्या कसून चौकशी केली जात आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये ‘हिट अँड रन’ च्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काही धनदांडगे, राजकारणी लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्था वाकविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
सर्वसामान्य नागरिक हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ‘हिट अँड रन’ सारखी प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि पीडितांना न्याय देण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
या प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, मग तो कितीही श्रीमंत, प्रभावशाली, किंवा नोकरशहा, लोकप्रतिनिधींची मुलं तसेच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही.
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी व आमचे शासन पीडित आणि त्यांच्या कुटुंबिंयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व जनतेसाठी, सुरक्षित महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.