क्रीडा सभापतींचे निर्देश : विविध विषयांवर चर्चा
नागपूर : नागपुरातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने उत्तम खेळाडू तयार व्हावे. त्यासाठी येथील खेळाडूंना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील खेळाडूंसाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी ‘क्रीडा धोरण’ तयार करण्यात येत आहे. त्याला तातडीने अंतिम स्वरूप देण्यात यावे, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा विशेष समितीचे सभापती प्रमोद तभाने यांनी दिले.
विविध विषयांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने मनपाच्या क्रीडा समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने बुधवारी (ता. ९) पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रमोद तभाने होते. बैठकीला उपसभापती लखन येरावार, सदस्य रुपाली ठाकूर, शेषराव गोतमारे, जिशान मुमताज मो. इरफान अंसारी, नरेंद्र वालदे, उपायुक्त मिलिंद मेश्राम, क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर उपस्थित होते.
मनपा सध्या क्रीडा धोरण तयार करीत आहे. मात्र, यात केवळ मनपा शाळांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्याच विचार न करता शहरातील प्रत्येक खेळाडू डोळ्यासमोर ठेवावा. नागपुरातील खेळाडूंना क्रीडाविषयक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने या धोरणाची निर्मिती करण्यात येत आहे. प्रत्येक खेळाडूच्या दृष्टीने या क्रीडा धोरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याला तातडीने अंतिम स्वरूप देऊन क्रीडा समितीच्या पुढील बैठकीत ते ठेवावे आणि तेथून मंजुरी घेऊन सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठवावे, असे निर्देश सभापती तभाने यांनी यावेळी दिले.
नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक असे सहा मैदाने विकसित करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने सभापतींनी चार मैदानांचा दौरा करून आवश्यक ते निर्देश दिले आहेत. उर्वरीत दोन मैदानांचा दौरा पुढील आठवड्यात करण्यात येईल. त्याचा डीपीआर तातडीने तयार करून लवकरात लवकर काम सुरू होईल, यादृष्टीने कार्यवाही सुरू करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया’ इन्फ्रा डेव्हलपमेंट स्कीमअंतर्गत मनपा नागपूर येथील विविध मैदान व प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्याबाबत आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. सोबतच मनपा क्रीडा विभागाच्या सर्व मैदानावर पाणी पुरवठा कार्यान्वित करणे व संचालित करण्यासाठी मनपाच्या वेबसाईटवर व्यवस्था करण्याबाबत दिलेल्या निवेदनाचा तसेच समर्थ व्यायाम शाळेच्या व्हॉलिबॉल मैदानात मागणी केलेली सुविधा पुरविण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचाही त्यांनी आढावा घेतला.