Published On : Wed, May 17th, 2017

शिवसंपर्क अभियानात तोतया आमदार प्रकरणी शिवसेनेविरूद्ध ‘420’ दाखल करा!

Advertisement
  • विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारविरोधात टीकास्त्र
  • विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याला रायगडावरून प्रारंभ
  • भाजपच्या शिवार संवाद यात्रेचे नाव ‘शिवराळ संवाद यात्रा’ ठेवा
  • सत्ताधारी पक्षांच्या यात्रा म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक


महाड:
शिवसंपर्क अभियानामध्ये उस्मानाबाद येथे शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात तोतया आमदार उभा केला म्हणून शिवसेनेविरूद्ध पोलिसांनी ‘चारसौ बिसी’चे गुन्हे दाखल करायला हवे, अशी खोचक मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

शेतकरी कर्जमाफी व हमीभावाच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या संघर्ष यात्रेचा प्रारंभ करताना बुधवारी सकाळी महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. सत्ताधारी भाजप व शिवसेना कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे कर्तव्य बजावण्याऐवजी यात्रा काढून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह विरोधी पक्षांचे आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gold Rate
Saturday 22 March 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900 /-
Silver / Kg 98,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तत्पूर्वी प्रमुख नेते आणि आमदारांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. चवदार तळ्याच्या शेजारी असलेल्या सभागृहात पत्रकारांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी होईस्तोवर संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी ते म्हणाले की, राज्य सरकारमध्ये दरोडेखोर असल्याचे उद्धव ठाकरेंनी अकोल्यात सांगितले. हे दरोडेखोरांचे सरकार असेल तर शिवसेनाही त्यात सहभागी असल्याचे त्यांनी विसरू नये. शिवसेनेचे शेतकरी प्रेम, कोकण प्रेम, मंत्र्यांचे राजीनामे अन् शिवसंपर्क अभियान सारे थोतांड आहे. जोपर्यंत शिवसेना शेतकरी कर्जमाफीसाठी मंत्र्यांचे राजीनामे देत नाही, तोपर्यंत त्यांच्या एकाही शब्दावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही.


भाजपचीही परिस्थिती शिवसेनेसारखीच आहे. येत्या 25 तारखेपासून ते शिवार संवाद यात्रा सुरू करताहेत. पण् भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत वापरलेल्या शिवराळ भाषेतून बळीराजाविषयी त्यांची मानसिकता स्पष्ट झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांबद्दल सरकार माफी मागायला तयार नाही. यावरून खा. दानवे यांच्या शिवराळ भाषेशी सरकार सहमत असल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या यात्रेचे नाव शिवार संवाद यात्रेऐवजी ‘शिवराळ संवाद यात्रा’ असायला हवे, अशी घणाघाती टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

सरकारने जीएसटीसाठी 20 तारखेपासून तीन दिवसांचे विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. शेतकरी आत्महत्यांचा गंभीर प्रश्न लक्षात घेता कर्जमाफीची घोषणा करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या माध्यमातून सरकारला विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. परंतु, अद्याप सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही. सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेनाही विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करते आहे. तरीही हे सरकार विशेष अधिवेशन घेण्यास तयार नाही. यावरून सरकारचा नकारात्मक दृष्टीकोन दिसून येतो, असे विखे पाटील पुढे म्हणाले.


केंद्र व राज्य सरकार केवळ पोकळ घोषणांचा कारभार करते आहे. काळा पैसा शोधून काढण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदी केली. पण् त्यातून काळा पैसा सापडला की नाही, ते सरकारलाच ठाऊक नाही. पण् लोकांच्या मेहनतीचा पांढरा पैसा गायब झाला. मागील अनेक दिवसांपासून एटीएममध्ये खडखडाट असल्याने अरे कुठे नेऊन ठेवल्या नोटा आमच्या? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले.

Advertisement
Advertisement