Published On : Tue, Nov 28th, 2017

बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी कराः सचिन सावंत

Girish Mahajan
मुंबई: वारंवार सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करणारे बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या विषयी प्रतिक्रिया व्यक्त सावंत म्हणाले की, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे आणि लोंढे शिवारात नरभक्षक बिबट्याच्या मागे बंदूक घेऊन धावत आहेत़ असा व्हिडीओ विविध वृत्तवाहिन्यांवर प्रसिध्द झाला असून महाजन यांनीही त्याची कबुली दिली आहे. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करण्याची महाजन यांची ही काही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वीही महाजन दिव्यांग मुलांच्या कार्यक्रमात आपल्या कमरेला बंदूक लावून गेले होते. एका आमदारालाही त्यांनी बंदुकीचा धाक दाखवल्याची घटना समोर आली होती. बंदूक चालवण्याचा अतिआत्मविश्वास कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या कुटुंबियांशी असलेल्या जवळिकीतून आला असावा असा टोला सावंत यांनी लगावला.

Advertisement

जलसंपदा खात्यातील ठेकेदारांनी आपल्याला शंभर कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला होते असे याच महाजनांनी सांगितले होते पण या संदर्भात लाचलुचपत खात्याकडे याची तक्रार केली नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दारूला महिलांची नावे द्यावे असे वक्तव्य केले होते. ट्रक चालवण्यासारखे स्टंट ही करून झाले आहेत.

हातात बंदूक घेऊन बिबट्याच्या मागे फिरणे हे जलसंपदा मंत्र्यांचे काम तर नाहीच पण भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा आहे असे म्हणत बेजबाबदार पणे शस्त्राचा वापर केल्यामुळे त्यांचा शस्त्र परवाना तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. गिरीष महाजन मंत्री म्हणून कामात झिरो असल्याने अशी स्टंटबाजी करून ते हिरो होण्याचा प्रयत्न करित आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या या बंदूकबाज मंत्र्यांला मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून स्टंटबाजी करण्यासाठी भविष्यात हॉलीवूडला पाठवावे असा टोला सावंत यांनी लगावला.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement