Published On : Fri, Sep 11th, 2020

युद्ध कोरोनाशी करा, व्यक्तीशी नाही!

कोव्हिड संवाद : डॉ. प्रमोद गांधी यांनी दिली कोरोनासंदर्भात उपयुक्त माहिती


नागपूर : आपल्या सोसायटीमध्ये कोणाला कोरोनाचे संक्रमण झाले तर आपण एक तर त्याला आयसोलेट करतो, अथवा स्वत: आयसोलेट होतो. परंतु, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आयसोलेट झाला असला तरी त्याला सहकार्य करा. त्याला दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी मदत करा. त्याचे मनोबल वाढवा. कारण आपले युद्ध कोरोनाशी आहे, कोरोना झालेल्या व्यक्तीशी नव्हे, असे उपयुक्त विधान किंग्जवे हॉस्पीटलचे डॉ. प्रमोद गांधी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या सहकार्याने ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना कोरोनाशी लढा देण्यासाठी उपयुक्त माहिती दिली जात आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यायला हवी, काय उपचार घ्यायला हवे, कुठले नियम पाळायला हवे याबाबतची माहिती त्यांना व्हावी या उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन दररोज दुपारी २ वाजता करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता. २) झालेल्या कार्यक्रमात किंग्जवे हॉस्पीटलचे डॉ. प्रमोद गांधी यांनी कोव्हिडबाबतची उपयुक्त माहिती देत नागरिकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिलीत.

कोव्हिडची पार्श्वभूमी सांगत त्यांनी त्याची लक्षणे, करावयाची चाचणी, चाचणी केव्हा आणि कोणी करायची, ॲण्टीजेन आणि आर.टी.-पीसीआर चाचणीमधील फरक काय, लक्षणे नसलेल्या रुग्णांनी किती दिवस आयसोलेशनमध्ये राहायला हवे, काय काळजी घ्यायला हवी, लक्षणे दिसू लागताच काय करायला हवे, याबाबत सविस्तर विवेचन केले. लक्षणे नसलेल्या व्यक्तींमुळे आज कोरोना समाजात वाढत आहे. अनेक जण पॉझिटिव्ह असतीलही. मात्र, आपल्याला काहीच लक्षणे नाहीत, असे म्हणून ते चाचणी करीत नाहीत. मात्र कुणीही जर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आला असेल तर त्याने तातडीने चाचणी करून घ्यायला हवी, चाचणीचा निकाल येतपर्यंत लोकांमध्ये मिसळू नये, चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला तर तातडीने शासनाच्या निर्देशानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनमध्ये राहायला हवे, असे सांगितले.


कोरोना आपणाला होऊ नये, यासाठी स्वत:च काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी ‘एस.एम.एस.’ हा मंत्र दिला. पहिला ‘एस’ म्हणजे सॅनिटाईज, ‘एम‘ म्हणजे मास्क आणि ‘एस’ म्हणजे सोशल डिस्टंसिंग. या मंत्राचा दैनंदिन जीवनात उपयोग केला तर कोरोनाला स्वत:पासून दूर ठेवण्यात प्रत्येकाला यश येईल, असे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी नागरिकांनी फेसबुकच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिलीत.

शनिवारी डॉ. केळकर आणि डॉ. अरोरा करणार मार्गदर्शन

‘कोव्हिड संवाद’च्या मालिकेत शनिवार १२ सप्टेंबर रोजी कन्सल्टंट फिजिशियन डॉ. अभय केळकर आणि ॲन्थस्थियासिस्ट डॉ. गौरी अरोरा मार्गदर्शन करतील. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर दुपारी २ वाजता या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होईल.