Published On : Sat, Sep 1st, 2018

फरेरा, गोन्झाल्व्हीस यांना अटक ही तत्कालिन आघाडी सरकारची चूक; पी.चिदंबरम

Advertisement

नागपूर : बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन वरावरा राव, अरुण फरेरा आणि वेर्नोन गोन्झाल्व्हीस यांना पुरेशा पुराव्याअभावी अटक करण्यात आली आहे. फरेरा व गोन्झाल्व्हीस यांना २००७ साली आघाडी सरकारने अटक केली होती. मात्र आता व तेव्हादेखील या लोकांविरोधात ठोस पुरावे नव्हते. त्यांना त्यावेळी झालेली अटक हीदेखील आघाडी सरकारची चूकच होती, असे वक्तव्य देशाचे माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी केले आहे. नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.

अगोदर अटक करण्यात आलेले व आता नजरकैदेत असलेले सर्व लोक हे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. देशात आपले विचार ठेवण्याचा व त्यांना मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे. कुणाचे विचार तीव्र डावे किंवा तीव्र उजवे असू शकतात. या कार्यकर्त्यांवर झालेली कारवाई हा महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष भटकविण्याचा प्रयत्न आहे. याचा आम्ही निषेधच करतो, असे पी.चिदंबरम म्हणाले. जर एखाद्या व्यक्ती प्रत्यक्ष हिंसेत सहभागी नसेल किंवा हिंसेसाठी चिथावणीदेखील दिली नसेल, तर त्याच्यावर तशी कलमं लावण्याचे कारण तरी काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

लोकशाहीच्या खच्चीकरणाचा प्रयत्न

मागील चार वर्षांपासून देशात भयाचे वातावरण आहे. जर कुणी सरकारविरोधात बोलले तर थेट कारवाई करण्यात येते. लोकशाहीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून हे प्रमाण वाढले आहे, असा आरोप पी.चिदंबरम यांनी केला.