Published On : Sat, Dec 8th, 2018

दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या वडिलांची हत्या

Advertisement

नागपूर : संपूर्ण कुटुंबाची वाताहत होऊनही व्यसन सोडायला आणि वर्तन सुधारायला तयार नसलेल्या एका व्यक्तीला त्याच्या लहान मुलानेच ठार मारले. संतोष प्रेमलाल बेनीबागडे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याची हत्या केल्यानंतर त्याचा लहान मुलगा आरोपी सचिन (वय २१) याने स्वत:च पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधना नगरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

मृत संतोष बेनीबागडे याला दारूचे भारी व्यसन होते. रोज दारू पिऊन आल्यानंतर तो घरात आदळआपट करून घरच्या सदस्यांना मारहाण करायचा. मोठमोठ्याने ओरडून तो घरातील साहित्यही फेकत होता. वारंवार समजावूनही त्यात फरक पडत नसल्यामुळे घरच्यांसोबत शेजाऱ्यांसाठीही संतोष डोकेदुखीचा विषय बनला होता. त्यामुळे त्याचे शेजाऱ्यांसोबतही पटत नव्हते. त्याच्या या वृत्तीला कंटाळून त्याची पत्नी सहा महिन्यांपूर्वी घर सोडून गेली होती.

मोठा मुलगा मनोज (वय २६) आणि लहान मुलगा सचिन कारपेंटरचे काम करून घर चालवित होते. नुसती दारू पिऊन रात्रंदिवस गोंधळ घालणाऱ्या संतोषला काही देणे-घेणे नव्हते. शुक्रवारी दुपारी मनोजच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे दोन्ही भावांची धावपळ सुरू असताना रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी सचिन घरी आला. तिकडे दारूच्या नशेत टुन्न होऊन आलेला संतोष त्याच्या घरात गोंधळ घालू लागला. रात्री ११ च्या सुमारास त्याने घरात फेकफाक सुरू केली.

सचिनने विरोध केला असता त्याला संतोषने मारहाण केली. त्यामुळे रागाच्या भरात सचिनने त्याच्या हातातून स्टीलचा रॉड हिसकावून घेत त्याच्या डोक्यावर फटका मारला. एकाच फटक्यात संतोष खाली कोसळला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे पाहून सचिनने त्याला उचलून डॉक्टरकडे नेण्यासाठी धावपळ केली. मात्र, तो निपचित पडला होता.

शेजाऱ्यांनी तो मृत झाल्याचे सचिनला सांगितले. त्यानंतर नंदनवन पोलिसांना शेजाऱ्याने माहिती दिली. आपल्या हातून जन्मदात्याची हत्या झाल्याने अस्वस्थ झालेला सचिन स्वत:च पोलीस ठाण्याकडे निघाला. वाटेत त्याला पोलिसांचे वाहन दिसताच त्याने ते थांबवून गुन्ह्याची माहिती देत स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले.

नशिबाची थट्टा !
या घटनेतून नशिबाने बेनीबागडे परिवाराची कशी थट्टा मांडली ते पुढे आले. वडिलांच्या वर्तनामुळे अवघे बेनीबागडे कुटुंबीयच त्रस्त झाले होते. सचिन आणि मनोजची आई त्यांना सोडून गेली होती. शुक्रवारी गर्भवती पत्नीची प्रकृती बिघडल्याने तिला त्याने रुग्णालयात दाखल केले. रात्री तो रुग्णालयात धावपळ करीत असताना लहान भावाच्या हातून वडिलांची हत्या घडल्याचे कळाल्याने तो पत्नीला सोडून घराकडे धावत आला. नंदनवन पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली.

दारुड्या वडिलांची हत्या केल्याचे त्याने तक्रारीत नमूद केल्यामुळे लहान भाऊ सचिन याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून कोठडीत टाकले. तो कोठडीत, पत्नी रुग्णालयात असताना मनोजवर मृत वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी धावपळ करण्याची वेळ आली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.