
नागपूर — केवळ ८०० रुपयांच्या उधारीचा वाद थेट रक्तरंजित हल्ल्यात रूपांतरित झाल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या वाठोड़ा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. उधार दिलेली रक्कम परत न मिळाल्याच्या रागातून एका युवकाने आपल्या दोन साथीदारांसह ओळखीच्या अल्पवयीनवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीनला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अखिल आणि आरोपी मयूर खोब्रागडे यांची पूर्वीपासून ओळख होती. सुमारे तीन महिन्यांपूर्वी अखिलने मयूरकडून ८०० रुपये उधार घेतले होते. ही रक्कम परत न मिळाल्याने मयूर मनात राग धरून होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, १२ डिसेंबर रोजी सकाळी मयूर आपल्या दोन साथीदारांसह अखिलच्या घरी पोहोचला. घरासमोर उभे राहून त्याने पैशांची मागणी करत शिवीगाळ सुरू केली. अखिलने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी संतापाच्या भरात त्याच्यावर हल्ला चढवला. याचवेळी मयूरने चाकू काढून अखिलवर सपासप वार केले, ज्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन जखमी अखिलला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. वाठोड़ा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हत्या करण्याच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे अल्प रकमेचा वादही किती भयावह स्वरूप धारण करू शकतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.








