
मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापले असतानाच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या राजकारणाबाबत धक्कादायक भाकीत केले आहे. येत्या 19 डिसेंबर रोजी केंद्रातील सत्तेत मोठी उलथापालथ होऊ शकते आणि देशाचा नवा पंतप्रधान मराठी असण्याची दाट शक्यता आहे, असा दावा त्यांनी केला.
पिंपरी-चिंचवड येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना त्यांनी हे विधान केले. संभाव्य पंतप्रधान भाजपमधीलच असू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांचा जोर वाढला आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केलेल्या “मराठी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो” या ट्विटबाबत खुलासा करताना चव्हाण म्हणाले की, या बदलाचा अर्थ सध्याच्या पंतप्रधानांना बाजूला व्हावे लागेल. “काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याने आमचा नेता पंतप्रधान होण्याची शक्यता नाही. मात्र सत्ताधारी गटातीलच एखादी व्यक्ती पुढे येऊ शकते आणि तो मराठी असू शकतो,” असे त्यांनी सांगितले.
या घडामोडींमागे जागतिक पातळीवरील मोठे कारण असल्याचे सांगत त्यांनी अमेरिकेतील एका संवेदनशील प्रकरणाचा उल्लेख केला. “अमेरिकन संसदेनं केलेल्या कायद्यानुसार 19 डिसेंबरला हजारो फोटो आणि ई-मेल्स सार्वजनिक होणार आहेत. यात कोणालाही सूट दिली जाणार नाही. या उघडकीमुळे जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्ती अडचणीत येऊ शकतात,” असे चव्हाण यांनी नमूद केले.
या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम भारताच्या राजकारणावरही होण्याची शक्यता असून, त्यामुळे केंद्रातील नेतृत्वात बदल संभवतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता 19 डिसेंबरला नेमके काय घडणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.










