वाशिम – समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील हद्दीत एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. हे सर्वजण पुण्याहून नागपूरकडे परतत होते.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये वैदही जैसवाल (२५), माधुरी जैसवाल (५२), राधेश्याम जैसवाल (६७) आणि संगीता जैसवाल (५५) यांचा समावेश आहे. हे चौघेही नागपूरच्या उमरेड परिसरातील रहिवासी होते. तर चेतन हेलगे (२५) या तरुण चालकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, जैसवाल कुटुंब पुण्यात एका खास कार्यक्रमासाठी गेले होते. परतीच्या मार्गावर त्यांच्या वाहनाचा समृद्धी महामार्गावर ताबा सुटला. गाडीने पलटी घेतल्याने मोठा अपघात झाला. राधेश्याम जैसवाल आणि इतर दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी संगीता जैसवाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघाताची खबर मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. चेतन हेलगे याची प्रकृती अद्यापही नाजूक असून, डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.