नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला, ज्यात रमेश बिराताल या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग क्रमांक ७ला अडवून जोरदार रास्ता रोको केला.
ही हृदयद्रावक घटना नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड गावाजवळ घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बिराताल हे आपल्या गावातून देवलापार येथे मजुरांना मजुरी देण्यासाठी दुचाकीने निघाले होते. दरम्यान, मध्यप्रदेशच्या बालाघाटकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी तीव्र होती की रमेश यांचे शरीर जवळपास १०० मीटरपर्यंत फरफटत गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर बसचालक वाहन सोडून घटनेस्थळावरून फरार झाला.
पोलीस उशिरा पोहोचले, नागरिकांचा संताप उफाळला-
घटनेची माहिती मिळूनही रामटेक पोलीस तब्बल दीड तासांनी घटनास्थळी पोहोचले. यामुळे संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ अडवून वाहतूक ठप्प केली. पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर व आश्वासनानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक पूर्वपदावर आली. या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. दोषी चालकाला तात्काळ अटक करण्यात यावी आणि मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.