Published On : Fri, Jun 18th, 2021

मानवी तस्करी विषयी कायदेविषयक जनजागृती

नागपूर: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, इंटरनॅशनल जस्टिस मिशन व आशा किरण बालगृह यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी तस्करी व लैंगिक शोषणाचे बळी याविषयी नुकतेच जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मानवी तस्करी कशाप्रकारे केल्या जाते व समाजाने कोणती सावधगिरी बाळगायला पाहिजे, याबाबत संगिता वारके यांनी सविस्तर माहिती दिली. पिडितांना न्याय मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणातर्फे केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती त्यांनी यावेळी दिली. विधी सेवा प्राधिकरणामार्फत पिडितांचे आधारकार्ड, राशनकार्ड, बँक खाते काढण्यासाठी विधी स्वंयसेवक मदत करतात, असे त्यांनी सांगितले.

ॲड. नईम मेमन यांनी भारतीय संविधानविषयी मार्गदर्शन केले. विधी सेवा प्राधिकरणातर्फे मिळणाऱ्या नुकसान भरपाईबाबत माहिती दिली.

विधी सेवा प्राधिकरण व इंटरनॅशनल जस्टिस मिशनतर्फे यावेळी आशा किरण बालगृहातील 47 लाभार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क, हँडवॉश पुरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा किरण बालगृहाच्या सिस्टर श्रीमती सुनिता तर सूत्रसंचालन व आभार विधी स्वयंसेविका संगिता वारके यांनी केले.