Published On : Fri, May 8th, 2020

कापूस खरेदी केंद्र वाढवून योग्य हमीभावाने खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा – विजय हटवार यांची मागणी

Advertisement

रामटेक – (कोविड १९)चा प्रादुभाव रोखण्याकरिता देश व राज्यात लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असून, शेती उत्पादनाला काही प्रमाणात सुट दिल्याने कमी प्रमाणात, कमी भावाने खरेदी सुरू असल्याने बहुतेक शेतकर्‍यांचा कापूस घरीच आहे. यास्तव पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी केंद्र वाढवून योग्य हमीभावाने खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी वस्त्रोद्योग मंत्री (महा. राज्य) यांना ई-मेलद्वारे भाजपा महाराष्ट्र प्रदेश (ओबीसी मोर्चा)चे उपाध्यक्ष विजय हटवार यांनी केली आहे.

बहुतेक शेतकर्‍यांचा कापूस मार्चमध्ये निघाल्यापासुन कोरोना विषाणूच्या लढय़ात संपूर्ण देशात, राज्यात टाळेबंदी व संचारबंदी लावण्यात आल्याने शेती उत्पादन सोडुन सर्व बंद असून, शेतकर्‍यांना कापूस विक्रीस विलंब होत असल्याने काही प्रमाणात सरकारी खरेदी सुरू करण्यात आली.

परंतु, भयंकर त्रास सहन करून गाडी भरून नेली तरी जिनिंगमध्ये प्रतिदिवसी २0 गाड्या घेत असून, हमीभावसुद्धा मिळत नसल्याने बहुतेक शेतकर्‍यांचा कापूस घरी भरून ठेवला आहे. यात अवकाळी वादळ, वारा, गारपीट, पावसाने कापूस खराब होऊन नुकसान होत आहे. हा चिंतेचा विषय होत असून, मे महिना लागल्याने तापमान वाढुन कापूस गरम होऊन खाज सुटु लागल्याने कुटुंबाला घरी राहणेसुद्धा कठीण होत आहे.

यास्तव आपण सरकारी व खाजगी कापूस खरेदी केंद्रात १00 गाड्यांप्रमाणे वाढवून हमीभाव ५५00 रुपये देऊन खरेदी करावा. जेणेकरून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. आणि देशात आलेल्या कोरोना विषाणू (कोविड १९)च्या महामारी संकटाच्या लढय़ात जगाचा पोशिंदा शेतकरी जोमाने लढा देऊ शकेल.

पावसाळ्यापूर्वी शेतकर्‍यांचा कापूस विना विलंब व योग्य हमीभाव म्हणजे ५५00 रुपयात सरकारी व खासगी केंद्राला त्वरित खरेदीची परवानगी देऊन कापूस खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी आग्रहाची मागणी वस्त्रोद्योग मंत्री अस्लम रमजानअली शेख यांना ई-मेलद्वारे विजय हटवार यांनी केली आहे.