Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Feb 26th, 2020

  शेतकर्‍यांची फसवणूक करणारे सरकार : बावनकुळे

  जिल्ह्यात धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
  शहर जिल्ह्यात 19 ठिकाणी आंदोलन

  आता गाव आणि मतदान केंद्रांवर आंदोलन

  नागपूर,: शेतकर्‍याच्या बांधावर नुकसानभरपाई नेऊन देणारे महाविकास आघाडीचे सरकार हेक्टरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई देण्यास असमर्थ ठरले असून बांधावर जाऊन मदत करण्याची सरकारची घोषणा फसवी ठरली. शेतकर्‍याची फसवणूक करणारे हे सरकार असल्याची टीका माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रपरिषदेत केली.

  संपूर्ण राज्यभर आज भारतीय जनता पक्षाचे मविआ सरकारविरोधात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्यात 13 ठिकाणी आणि शहरात 6 ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात सुमारे 10 हजारापेक्षा अधिक लोक या आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. यापुढे आता ज्या गावांवर अन्याय झाला, विकास कामे बंद पडलीत त्या गावांमध्ये व मतदान केंद्रावर जाऊन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी यावेळी दिली.

  नागपूर जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या निधीत कपात, विविध विकास कामांचा निधी परत मागण्याचे प्रकार, यापूर्वीच्या शासनाने घेतलेले निर्णय बदलविण्याचा प्रकार, महिलांवर होणारे वाढते अत्याचार, या सर्वांचा निषेध करण्यासाठी हे धरणे आंदोलन आज करण्यात आले. शेतकर्‍याचा सात बारा कोरा करू अशी घोषणा या शासनाने केली होती. आज फक्त 15 हजार शेतकर्‍यांची यादी प्रसिध्द करून शेतकर्‍याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या शासनाने केले आहे. तूर खरेदीचे निकष बदलविण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांकडून तूर खरेदीचे प्रमाण खूप कमी झाले. शेतकर्‍यांची ही घोर फसवणूक असून याचाही आम्ही आजच्या आंदोलनात निषेध केला. तसेच नागपूरची जिल्हा नियोजन समिती 776 कोटींचीच राहिली तर मी जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांचे अभिनंदन करेन असेही बावनकुळे म्हणाले.

  कामठी येथे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी अनिल निधान, किशोर बेले, राजेश रंगारी, मनोज चवरे, विवेक मंगतानी, रमेश चिकटे यांच्यासह हजारो कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी झाले. मौदा तहसिल कार्यालयासमोर सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात, नागपूर ग्रामीण तहसिलकार्यालयासमोर माजी आ. अशोक मानकर यांच्या नेतृत्वा, उमरेड तहसिल कार्यालयासमोर माजी आ. सुधीर पारवे यांच्या नेतृत्वात, हिंगणा तहसिल कार्यालयासमोर धनराज आष्टनकर, भिवापूर तहसिल कार्यालयासमोर भास्कर येंगळे यांच्या नेतृत्वा, कुही येथे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात, रामटेक येथे अर्चना डेहनकर व विकास तोतडे यांच्या नेतृत्वा, पारशिवनी येथे अशोक धोटे, अविनाश खळतकर यांच्या नेतृत्वात, सावनेर येथे दादाराव मंगळे, संजय टेकाडे यांच्या नेतृत्वात, कळमेश्वर तहसिल समोर डॉ. राजीव पोतदार, किशोर रेवतकर यांच्या नेतृत्वात, काटोल तहसिलसमोर चरणसिंग ठाकूर, संदीप सरोदे, यांच्या नेतृत्वात, नरेखेड येथे रमेश कोरडे, उकेश चव्हाण यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करून शेतकरीविरोधी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

  पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी आ. अशोक मानकर, रमेश मानकर, अशोक धोटे, चरणसिंग ठाकूर, अनिल निधान, किशोर रेवतकर,अजय बोढारे, मनोज चवरे आदी उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145