Published On : Sun, Apr 22nd, 2018

‘गुजगोष्टी’ साठी ‘रणांगण’च्या कलाकारांना तब्बल २ तास उशिर, चाहत्यांचा कार्यक्रमावर बहिष्कार

Advertisement

नागपूर – मराठी सिनेसृष्टीचा ‘शाहरुख खान’ असे बिरुद मिळालेला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच ‘रणांगण’ या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सचिन पिळगावकर, सिद्धार्थ चांदेकर, प्रणाली घोगरे अश्या तगड्या कलाकारांची फळी आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वप्नील आणि इतर कलाकार नुकतेच संत्रानगरीत येऊन गेले.

त्याचसंदर्भात मटा कल्चर क्लब (महाराष्ट्र टाइम्स) तर्फे ‘रणांगण टीमसोबत गुजगोष्टी’ ह्या कार्यक्रमाचे शनिवारी टॅमरिंड हॉल, चिटणवीस सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ५ ते ७ दरम्यान होती. परंतु कार्यक्रमाची वेळ टळून तब्बल दोन होऊन गेले तरी स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर आणि प्रणाली घोगरे हे कलाकार कार्यक्रमस्थळी पोहोचलेच नाहीत. कलाकारांनी अजिबात वेळ न पाळल्याने कार्यक्रमस्थळी उपस्थित मटा कल्चर क्लबच्या सदस्यांनी कमालीचा रोष होता. आपल्या लाडक्या कलाकारांची भेट घेण्यास त्यांच्याशी संवाद साधण्यास आसुसलेल्या प्रेक्षकांची घोर निराश झाली. आयोजकांकडून वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे अखेर कंटाळून बऱ्याच प्रेक्षकांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला व सभागृह सोडले. अनेकांनी याबाबत ‘नागपूर टुडे प्रतिनिधी’ कडे तक्रार देखील केली.

त्यानंतर ७:१५ ते ७:३० वाजताच्या दरम्यान कलाकारांचे आगमन कार्यक्रमस्थळी झाल्याची माहिती अंतस्थ सूत्रांनी दिली. रणांगण चित्रपटाच्या तिन्ही कलाकारांना सदर कार्यक्रमानंतर ८:३० च्या विमानाने लगेच मुंबईला निघायचे होते. परंतु कार्यक्रमस्थळी स्वतःच उशिरा पोहोचल्याने आणि मटा कल्चर क्लबच्या सदस्यांचा रोष पाहता त्यांनी आपले जाणे रद्द केल्याचे कळले. हिंदी कलाकारांच्या उशिरा येण्याच्या सवयीची लागण आता मराठी कलाकारांनाही झाल्याची चर्चा या निमित्ताने रंगली होती.

रणांगण हा चित्रपट पुढील महिन्यात ११ तारखेला प्रदर्शित होत आहे. यामध्ये सचिन पिळगावकर राजकीय व्यक्तीची भूमिका साकारत आहेत तर स्वप्नील जोशी त्यांच्या विरुद्ध खलनायकी भूमिकेत दिसणार आहे.