Published On : Sun, Apr 22nd, 2018

सचिन सावंत मुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या

मुंबई : शिवसेना नेत्यांच्या हत्येचं सत्र अद्याप सुरुच आहे. अहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईतील मालाडमध्ये शिवसेना नेत्याची हत्या झाली आहे. मालाडमधील माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची अज्ञातांनी गोळीबार करुन हत्या केली.

सचिन सावंत हे शिवसेनेच्या मालाडमधील शाखा क्रमांक 39 चे माजी उपशाखाप्रमुख होते. त्यांच्यावर अज्ञातांनी तीन राऊंड गोळीबार केला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कुरारमधील गोकुळनगर परिसरात ही घटना घडली.

गोळीबारानंतर सचिन सावंत यांना महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन नेत्यांची हत्या झाली, तर कालच भिवंडीत शहापूरचे तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह जाळण्यात आला होता.

गेल्या काही दिवसात राज्यात शिवसेनेच्या नेत्यांवरील जीवघेणे हल्ले वाढले आहेत. नगरमधील हत्येच्या घटनेची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा गंभीर दखल घेतली होती.