Published On : Wed, Oct 14th, 2020

कौटुंबिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होईल – न्या.व्ही.एम.देशपांडे

Advertisement

भंडारा कौटुंबिक न्यायालय ईमारतीचे उद्घाटन

भंडारा : कौटुंबिक न्यायालय ईमारतीच्या रूपाने कौटुंबिक विवादाकरिता एक वेगळा न्यायमंच अस्तित्वात आल्यामुळे फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांमुळे दुय्यम स्थान मिळणारी कौटुंबिक प्रकरणे गतीने चालण्यास मुक्त होऊन कौटुंबिक प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होईल, अशी अपेक्षा न्या.व्ही.एम. देशपांडे यांनी व्यक्त केली. ते भंडारा येथील कौटुंबिक न्यायालय ईमारतीच्या दद्घाटन प्रसंगी बोलत होते.

जिल्हा न्यायालय, भंडारा येथील कौटुंबिक न्यायालयाच्या ईमारतीचे ई-उद्घाटन समारंभ नुकताच न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे, उच्च न्यायालय, मुंबई, नागपूर खंडपीठ, नागपूर तथा पालक न्यायमूर्ती, भंडारा यांचे शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती श्रीमती पी.व्ही. गनेडीवाला, उच्च न्यायालय, मुंबई, नागपूर खंडपीठ, नागपूर तथा पालक न्यायमूर्ती, कौटुंबिक न्यायालये, नागपूर विभाग, महाराष्ट्र हे होते तर संजय देशमुख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, भंडारा हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

कौटुंबिक न्यायालय इमारतीचे नामफलकाचे अनावरण करुन आभासी उद्घाटन करण्यात आले. तसेच कौटुंबिक न्यायालय इमारतीचे सर्व भागांची व्हिडीओ क्लिप ई-लिंक देउन श्रोत्यांना दाखविण्यात आली.

न्यायमूर्ती व्ही.एम.देशपांडे यांनी नवनियुक्त कौटुंबिक न्यायाधीश, श्रीमती ए.बी.शर्मा यांना त्यांच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच संकल्पना वेगळी आणि संकल्पनेला मुर्त स्वरुप देणे वेगळे या दोन वेगवेगळया बाबी आहेत असे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी कौटुंबिक न्यायालयातील ईमारतीमधील अस्तित्वात असलेल्या आवश्यक सोयी, सुविधा आणि उपकरणे याबाबत समाधान व्यक्त केले. कौटुंबिक विवादाकरिता एक वेगळा न्यायमंच अस्तित्वात आल्यामुळे फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांमुळे कौटुंबिक प्रकरणांना दुय्यम स्थान मिळत होते, त्यामुळे ही कौटुंबिक प्रकरणे गतीने चालण्यास मुक्त होउन त्यांना कौटुंबिक न्यायालयात प्राधान्य मिळून कौटुंबिक प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कौटुंबिक न्यायालयात कौटुंबिक प्रकरणे सामजंस्याने, मध्यस्थीने व जलद गतीने निकाली निघतील अशी अपेक्षा न्या.श्रीमती पी.व्ही.गनेडीवाला यांनी व्यक्त केली. समुपदेशनाचे महत्व विशद करुन त्याद्वारे संवेदनशीलतेने कौटुंबिक प्रकरणांचा निपटारा करण्यावर अधिक प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले.

संजय आ. देशमुख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, भंडारा यांनी स्वागतपर भाषणाद्वारे कार्यक्रमाची रूपरेषा व्यक्त केली. तसेच भंडारा जिल्हयाकरिता हा समारंभ सुवर्ण क्षण असून कौटुंबिक न्यायालयामधील प्रकरणे ही समुपदेशनाद्वारे प्राधान्याने हाताळली जावीत. तसेच मतभेद असावेत परंतु मनभेद नसावेत असे त्यांनी सांगीतले.

आर.के.सक्सेना, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, भंडारा यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये कौटुंबिक न्यायालया विषयी माहिती सांगीतली तसेच कौटुबिक प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होईल अशी आशा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती ए.बी. शर्मा, न्यायाधीश, कौटुबिक न्यायालय, भंडारा यांनी आभासी उपस्थित पाहुण्यांचे विशेष आभार व्यक्त करून उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. समारंभाची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.

सदर उद्घाटन समारंभाला श्रीमती ए.बी. शर्मा, न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, भंडारा, आर.के.सक्सेना, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, भंडारा व सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा अधिवक्ता संघ भंडारा येथील अधिवक्ते, विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी, जिल्हा न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्याक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सी वाय नेवारे, 3 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, भंडारा यांनी केले.