Published On : Tue, Dec 14th, 2021
By Nagpur Today Nagpur News

अपहरण सामुहिक बलात्काराची तक्रार निघाली खोटी

नागपूर – उपराजधानीच्या मध्य भागातून अपहरण करून कळमन्यात नेल्यानंतर दोन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला, अशी तक्रार देणाऱ्या तरुणीने अखेर घुमजाव केले. प्रेम प्रकरण आणि व्यक्तीगत कारणातून ही सामुहिक बलात्काराची कल्पोकल्पीत तक्रार आपण नोंदवली, अशी कबुलीही तिने पोलीस अधिकाऱ्यांना दिली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी रात्री १० च्या सुमारास पत्रकारांशी चर्चा करून हा धक्कादायक खुलासा केला.

उपराजधानीत प्रचंड खळबळ उडवून देत अवघ्या शहर पोलीस यंत्रणेला तब्बल ९ तास वेठीस धरणारी ही तरुणी (वय १९) फेटरी मार्गावरील रहिवासी आहे. ती महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून संगीताचे धडे घेण्यासाठी रोज रामदास पेठेतील एका इमारतीत येते. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दगडी पार्कजवळून जात असताना एक कार (व्हॅन) आपल्याजवळ थांबली. बुटीबोरीकडे कुठून जावे लागते, असे विचारून एकाने जवळ बोलविले आणि दुसऱ्या एकाने कारमध्ये कोंबले. कारमध्ये मारहाण करून तोंडावर कापड बांधल्यानंतर कळमन्यात नेले. चिखली जवळच्या निर्जन परिसरात नेऊन जीवे मारण्याची धमकी देत आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला, असे तिने कळमना पोलिसांत तक्रार देताना सांगितले.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ठाणेदार विनोद पाटील यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांना कळविले. अपहरण आणि सामुहिक बलात्काराचा गुन्हा घडल्याचे कळाल्याने गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त विनिता साहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित, वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी तपासकामात गुंतले. तरुणीची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि सहआयुक्त अस्वती दोरजे यांनी तपासच आपल्या नजरेसमोर ठेवला.

मूनलाईट स्टूडिओपासून सीताबर्डी, झांशी राणी चाैक, पंचशिल चाैक, दगडी पार्क, रामदासपेठेतील ७० खासगी आणि १८० स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन प्रत्येक पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात ते तपासण्यात आले. सकाळी ९.३० ते १०.१५ या वेळेत ही तरुणी सीताबर्डीतील वेगवेगळ्या भागात फिरली. आनंद टॉकीजजवळून तिने नंतर ऑटो पकडून मेयो चाैक गाठला. तेथून दुसरा ऑटो करून ती कळमन्यात पोहचली. नंतर दुपारी १२ वाजता पोलीस ठाण्यात आली. ज्या दगडी पार्कजवळून अपहरण झाल्याची तिने बतावणी केली तेथे ती पोहचलीच नाही, असेही स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस चक्रावले.

१० उपायुक्तांसह १ हजार पोलीस या तपासात गुंतले होते. त्यांनाही असे काही घडल्याचा कोणताच पुरावा आढळला नाही. वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सामुहिक बलात्काराबाबत शंका व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांनी या तरुणीला विश्वासात घेत नव्याने विचारपूस सुरू केली. त्यानंतर तिने असे काहीही घडले नाही. आपण व्यक्तीगत कारणामुळे हा बनाव करून खोटी तक्रार केल्याची कबुली तिने पोलिस अधिकाऱ्यांसमोर दिल्याचे पोलीस आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले.

तिच्यावर कारवाई होणार-

ज्या ऑटोत ती सीताबर्डीतून मेयो आणि नंतर कळमन्यात पोहचली. त्या दोन्ही ऑटोचालकाचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही छडा लावल्याचे आयुक्तांनी सांगितले. तरुणीने अपहरण आणि बलात्काराची खोटी तक्रार का दिली, ते जाहिर करणे योग्य होणार नसल्याचे अमितेशकुमार म्हणाले. मात्र, नोंदविण्यात आलेला सामुहिक बलात्काराचा गुन्हा रद्द केला जाईल आणि तिच्यावर कायदेशिर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

Advertisement
Advertisement